Property Law:- कुठलाही प्रकारची प्रॉपर्टी असली तर त्या प्रॉपर्टी संदर्भामध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात व त्या पाळणे देखील तितकेच गरजेचे असते. जेव्हाही एखाद्या मालमत्ता खरेदी-विक्रीचा विषय येतो तेव्हा बऱ्याच कुटुंबांमध्ये काही मुद्द्यांना धरून वाद होताना आपल्याला दिसतात व प्रामुख्याने म्हणजे असे वाद वडीलोपार्जित मालमत्तेच्या बाबतीत जास्त दिसून येते.वडिलोपार्जित मालमत्ता असेल व तुम्हाला तुमचा वाटा हवा असेल व त्याकरिता वाटपाचा दावा दाखल करायचा असेल तर तुम्हाला अनेक गोष्टींना धरून काळजी घेणे खूप गरजेचे असते. चला तर मग या लेखात बघू की वडिलोपार्जित मालमत्तेत वाटपाचा दावा दाखल करताना कोणती काळजी घ्यावी? यासंबंधीची माहिती आपण या लेखात बघणार आहोत.
वडिलोपार्जित मालमत्तेत वाटपाचा दावा दाखल करताना काय काळजी घ्यावी?
वडिलोपार्जित मालमत्ता असेल व त्यावर सह हिस्सेदार असतील तर विक्रीच्या संदर्भात तुम्हाला सगळ्या सहहिस्सेदारांची संमती घेणे गरजेचे असते व सर्व सहहिस्सेदारांची जर संमती असेल तर मग कुठलाच प्रकारचा वाद व प्रश्न यामध्ये राहत नाही. परंतु बऱ्याचदा त्या प्रॉपर्टीवर असलेले वारस काही विरोध किंवा अडथळा आणतात व अशावेळी मात्र वाटपाचा दावा दाखल करणे गरजेचे असते. परंतु तुम्हाला जर कुठलाही दावा दाखल करायचा राहिला तर त्याकरिता प्रतिवादी लागतो व अशा वाटपाच्या दाव्यात नेमका प्रतिवादी कुणाला करायचं हा एक मोठा प्रश्न उद्भवतो. अशावेळी तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवावी की ती म्हणजे जे सह हिस्सेदार वाटपाला तयार नाही त्या प्रत्येकाला दाव्यात प्रतिवादी करणे गरजेचे असते व तसे करावे लागते. सातबारा उताराच्या आधारे हा निर्णय घेऊ नये. जर तुम्ही सातबाराच्या आधारे निर्णय घेतला तर तो लांबचा किंवा वेळखाऊ देखील ठरू शकतो.

सातबारा उताऱ्यानुसार कोणाला प्रतिवादी करायचे?
अशा प्रकरणांमध्ये समजा एखाद्या व्यक्तीचे नाव सातबारा उताऱ्यावर आहे व म्हणून त्याला प्रतिवादी करायचं. पण एखाद्या व्यक्तीचं नाव सातबारा उताऱ्यावर नसेल तर त्याला प्रतिवादी करायचं नाही का? हा एक मोठा प्रश्न उभा राहतो. परंतु यामध्ये लक्षात घ्यावे की सातबारा उताऱ्यावर नाव असलेला प्रत्येकजण त्या मालमत्तेचा मालक असतोच असं नाही आणि यामध्ये एखाद्याचे नाव सातबारा उताऱ्यावर नाही म्हणजे तो त्या मालमत्तेचा मालक किंवा सहहिस्सेदार नाहीत असे देखील होत नसते. कारण बऱ्याचदा सातबारा उतारा अपडेटेड नसतो. म्हणजेच त्यावर काही व्यक्तींची नावे कमी केलेली नसू शकतात किंवा काही योग्य व्यक्तींची नावे सहहिस्सेदार आहेत त्यांची नावे चढवलेली नसू शकतात.
अशाप्रसंगी जो सहहिस्सेदार आहे त्याचंच नाव जर प्रतिवादी मध्ये नसेल तर मग तुम्ही दाखल केलेल्या दाव्यालाच काही अर्थ उरत नाही. तसेच काही सहहिस्सेदार हे तटस्थ असण्याची शक्यता असते. परंतु या सगळ्यांनाच प्रतिवादी कराव लागेल व त्याकरिता वंशावळीचा आधार घ्यायला हवा आणि त्यानुसार दाव्यात त्या सगळ्यांची नावे असणे गरजेचे आहे. सगळ्यात महत्वाची म्हणजे अशा पद्धतीचा वाटपाचा दावा जर तुम्हाला देखील दाखल करायचा असेल तर तुम्ही कायदेशीर मार्गाने आणि तज्ञ वकिलांची मदत घेणे यामध्ये खूप फायद्याचे ठरू शकते.