Upcoming IPO:- भारतातील टेलिकॉम क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी म्हणून रिलायन्स जिओ ओळखली जाते. मुकेश अंबानी यांच्या मालकीची ही टेलिकॉम कंपनी असून आज भारतामध्ये या कंपनीचे सगळ्यात जास्त ग्राहक आहेत. जर आपण साधारणपणे बघितले तर आज भारतामध्ये 50 कोटीच्या आसपास जिओचे ग्राहक आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानींच्या माध्यमातून शुक्रवारी एक महत्त्वाची अशी घोषणा करण्यात आली व ही घोषणा रिलायन्स जिओ आयपीओ बद्दल आहे. चला तर मग या संबंधीचीच माहिती आपण या लेखात बघू.
लवकरच येणार रिलायन्स जिओचा आयपीओ
याबाबत सविस्तर वृत्त असे की, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी शुक्रवारी एक मोठी घोषणा केली व त्यांनी यावेळी म्हटले की रिलायन्स जिओचा आयपीओ पुढील वर्षी 2026 च्या पहिल्या सहामाहीत बाजारामध्ये आणला जाणार आहे. शुक्रवारी कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली व या सभेमध्ये मुकेश अंबानी यांनी सांगितले की टेलिकॉम आणि डिजिटल रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्म 2026 च्या पहिल्या सहामाहीत आयपीओ लाँच करण्यासाठी अर्ज करेल. तसेच त्यांनी पुढे म्हटले की आवश्यक असलेल्या सर्व परवानगी मिळाल्यानंतर रिलायन्स जिओ 2026 च्या पहिल्या सहामाहीत भारतीय शेअर बाजारामध्ये लिस्टेड होईल. पुढे त्यांनी म्हटले की मी तुम्हाला खात्री देतो की जिओ देखील त्याच्या जागतिक स्पर्धकांप्रमाणे मोठ्या प्रमाणात मूल्य निर्माण करण्यास सक्षम आहे व मला विश्वास आहे की सर्व गुंतवणूकदारांसाठी ही एक अतिशय आकर्षक संधी ठरणार आहे.

शेअर होल्डर्सना संबोधित करताना काय म्हटले अंबानी?
आपल्या शेअर होल्डर्स ना संबोधित करताना मुकेश अंबानी यांनी म्हटले की, एक आठवड्यानंतर जिओ त्याच्या सेवांच्या दहाव्या वर्षात प्रवेश करणार आहे. जर या दहा वर्षात मागे वळून पाहिले तर भारताच्या डिजिटल इतिहासातील हे 10 वर्ष सर्वात गौरवशाली होती. तसेच त्यांनी पुढे म्हटले की मला हे सांगताना अभिमान वाटतो की जीओ कुटुंबाने 50 कोटी वापरकर्त्यांचा टप्पा ओलांडला आहे व ही कामगिरी तुमच्या अढळ विश्वासाचे आणि पाठिंब्याचे प्रतीक असल्याचे देखील त्यांनी नमूद केले.