EPFO News:- कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओ अतिशय महत्त्वाची संघटना असून देशातील सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत या संघटनेचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. कर्मचाऱ्यांचे प्रॉव्हिडंट फंड अर्थात पीएफ खात्याच्या बाबतीत आणि पेन्शनशी संबंधित अनेक महत्त्वाचे निर्णय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या माध्यमातून घेतले जातात व अनेक सुविधा या कर्मचाऱ्यांना दिल्या जातात. या प्रकारच्या सुविधा जलद गतीने मिळाव्यात याकरिता ईपीएफओच्या माध्यमातून अनेक महत्त्वाच्या सुविधा या डिजिटल करण्यात येत आहेत व यामुळे सदस्यांना अनेक प्रकारचे फायदे मिळण्यास मदत होणार आहे. याकरिता ईपीएफओ लवकरात लवकर ईपीएफओ 3.0 नावाचे एक डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू करण्याच्या तयारीत असून त्यामुळे कर्मचाऱ्यांना अनेक बाबतीत खूप मोठा दिलासा मिळणार आहे. चला तर मग त्यासंबंधीची माहिती आपण या ठिकाणी बघू.
या डिजिटल प्लॅटफॉर्मचे काय होतील फायदे?
1- एटीएममधून काढता येतील पैसे- आपल्याला माहित आहे की जर पीएफचा पैसा काढायचा असेल तर याकरिता आपल्याला ऑनलाइन क्लेम दाखल करावा लागतो व त्यावर प्रक्रिया होऊन पैसे खात्यात यायला खूप मोठा कालावधी लागतो. परंतु आता या नवीन डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे सदस्यांना थेट एटीएम मशीन मधून पीएफ खात्यातील पैसे काढता येणे शक्य होणार आहे. याकरिता फक्त सदर कर्मचाऱ्यांचा युएएन नंबर ऍक्टिव्ह असणे गरजेचे आहे व त्यासोबतच आधार व बँक खाते लिंक करणे आवश्यक आहे.

2- यूपीआय द्वारे पैसे काढता येतील- आज ज्याप्रमाणे भारतामध्ये मोठ्या प्रमाणात पेमेंट साठी यूपीआयचा वापर केला जातो. याच यूपीआयचा फायदा आता ईपीएफओच्या सदस्यांना देखील मिळणार आहे. नवीन प्लॅटफॉर्मवरून यूपीआय ॲप्सच्या मदतीने पीएफची रक्कम ट्रान्सफर देखील करता येणार आहे. त्यामुळे क्लेम करण्याची प्रक्रिया देखील सोपी आणि सुटसुटीत होणार आहेत.
3- खात्यातील चुकांची दुरुस्ती- या अगोदर जर खात्यातील नाव किंवा जन्मतारीख किंवा इतर प्रकारच्या चुका असतील तर त्या दुरुस्त करण्याकरिता ईपीएफओ कार्यालयामध्ये जावे लागत होते. परंतु आता या गोष्टीची आवश्यकता भासणार नाही. या नवीन डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आता फक्त ओटीपी व्हेरिफिकेशनच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने या चुका दुरुस्त करता येणार आहेत व क्लेमची स्टेटस देखील मोबाईलवर पाहता येणार आहे.
4- मृत्यू झाल्यास सोप्या पद्धतीने क्लेमची प्रक्रिया करता येणार- समजा एखाद्या सदस्याचा जर मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबातील लोकांना क्लेम मिळवताना खूप अडचणींना तोंड द्यावे लागत होते. समजा याच्यामध्ये जर वारस अल्पवयीन असेल तर गार्डियनशिप सर्टिफिकेट आवश्यक होते. परंतु आता या नवीन डिजिटल प्रणालीमुळे या प्रकारच्या क्लेमसाठी कुठलीच गरज राहणार नाही व प्रक्रिया वेगात पार पडून लवकरात लवकर आर्थिक मदत मिळणे शक्य होईल.
5- मोबाईलवरच मिळतील अनेक सेवा- एपीएफओच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मचा फायदा म्हणजे ईपीएफओ सदस्यांना कोणत्याही ठिकाणी आणि कोणत्याही वेळी त्यांच्या खात्यातील रक्कम तसेच मिळणाऱ्या व्याजाची माहिती व क्लेम केला असेल तर त्याची स्टेटस अगदी मोबाईलवर पाहता येणार आहे.