Petrol And Diesel Price : सध्या संपूर्ण भारतभर जीएसटीची चर्चा सुरू आहे. गेल्या महिन्यात स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लवकरच जीएसटी मध्ये मोठी कपात करण्यात येईल अशी घोषणा केली होती. अत्यावश्यक आणि जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी कमी केला जाईल असे संकेत त्यांनी दिले होते.
यानुसार 56 व्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत जीएसटीमध्ये मोठी सुधारणा करण्यात आली. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी जीएसटीचे दोन स्लॅब पूर्णतः रद्द करण्याची घोषणा केली. 12% आणि 28% हे दोन स्लॅब सरकारने रद्द केलेत. आता फक्त पाच टक्के आणि 18% हे दोन स्लॅब आहेत.

यामुळे अनेक वस्तू वरील जीएसटी कमी झाला आहे तर काही वस्तूंवरील जीएसटी शून्य करण्यात आला आहे. दूध सारख्या जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी शून्य करण्याचा मोठा निर्णय सरकारने घेतलेला आहे.
तसेच कृषी यांत्रिकीकरणावरील जीएसटी 5% करण्यात आलाय. दरम्यान जीएसटीचे नवीन रेट 22 सप्टेंबर पासून लागू करण्यात येणार आहेत. अशा या परिस्थितीत अनेकांच्या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेल सुद्धा जीएसटीच्या कक्षेत आणले गेले पाहिजे होते अशी आशा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान आज आपण जर खरंच सरकारने पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणले तर किमती किती कमी होऊ शकतात याचा एक आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
किमती किती कमी होऊ शकतात?
आज जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेनुसार दारू आणि पेट्रोल डिझेल सारखे इंधन जीएसटीच्या कक्ष बाहेर आहेत. पण जर पेट्रोल आणि डिझेल जीएसटी च्या कक्षेत आले तर त्यांची किंमत 40 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते.
आज पेट्रोल आणि डिझेलवर केंद्र आणि राज्य सरकारकडून वेगवेगळे करवसूल केले जातात त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल मूळ किमतीच्या दुप्पट होते. आता समजा पेट्रोलची मूळ किंमत पन्नास रुपये प्रति लिटर आहे.
जर पेट्रोल जीएसटी मध्ये समाविष्ट झाले आणि यावर 28 टक्के जीएसटी लागू झाला तर पेट्रोलच्या एक लिटर ची किंमत 64 रुपये असेल. आजच्या घडीला पेट्रोलची किंमत शंभर रुपयांच्या आसपास आहे.
यानुसार जीएसटी मध्ये समाविष्ट झाल्यानंतर पेट्रोलचे रेट 40 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतात असा अंदाज व्यक्त केला जातोय. पण पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्यासाठी सरकार फारसे उत्साही दिसत नाही.