Maharashtra Government Scheme : गेल्या काही वर्षांपासून केंद्र आणि महाराष्ट्र राज्य सरकारकडून महिलांसाठी मोठमोठ्या योजना सुरू केल्या जात आहेत. गेल्या वर्षी राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळत आहेत.
दुसरीकडे गेल्यावर्षी महिलांसाठी आणखी एका योजनेची घोषणा झाली. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना असे याचे नाव. राज्य सरकारने घरगुती इंधनाचा खर्च कमी करण्यासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची सुरूवात केली आहे.

या योजनेचा गॅस कनेक्शन असणाऱ्या महिलांना लाभ मिळणार आहे. या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना दरवर्षी १४.२ किलो वजनाचे तीन गॅस सिलिंडर मोफत दिले जातील.
केंद्र सरकारकडून ३०० रुपये आणि राज्य सरकारकडून ५३० रुपये मिळून एकूण ८३० रुपयांचे अनुदान मिळते, ज्यामुळे सिलिंडर पूर्णपणे मोफत उपलब्ध होणार आहे. या योजनेचा लाभ दर महिन्याला एकदाच घेता येईल.
तसेच वर्षभरात जास्तीत जास्त तीन सिलिंडरपर्यंतच मर्यादित राहील. ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना याचा मोठा फायदा होणार असून महिलांना स्वच्छ इंधनाचा वापर करता येईल. धुरापासून होणाऱ्या आरोग्य समस्यांपासून मुक्ती मिळून पर्यावरणाच्या रक्षणालाही मदत होणार आहे.
योजनेचे फायदे
दरवर्षी तीन मोफत गॅस सिलिंडर.
महिलांचे व मुलांचे आरोग्य सुधारेल.
वेळ आणि खर्चाची बचत.
घरात स्वच्छतेचे वातावरण टिकेल.
योजनेच्या अटी
गॅस जोडणी महिलेच्या नावावर असावी. तसेच, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना किंवा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांनाच या योजनेचा लाभ मिळेल. एका रेशन कार्डावर फक्त एका महिलेलाच हा लाभ मिळणार आहे.
अर्ज प्रक्रिया
अर्ज ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही माध्यमातून करता येईल. ऑनलाइन अर्जासाठी अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करावी लागेल.
तर ऑफलाइन अर्जासाठी अर्जदार महिलांनी अन्नपूर्णा योजना फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रांसह जवळच्या गॅस कनेक्शन कार्यालयात जमा करावा लागेल.
या योजनेमुळे राज्यातील गरीब कुटुंबांना मोफत इंधनाची सोय होऊन आर्थिक भार हलका होईल आणि महिलांच्या आयुष्यात सुलभता येईल.