EPFO News : देशातील संघटित क्षेत्रातील कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांचे पीएफ अकाउंट असते. पीएफ अकाउंट ईपीएफओ संस्थेद्वारे चालवले जाते.
ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे 8 कोटी सदस्य आहेत. आता याच ईपीएफओ च्या कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे. कर्मचाऱ्यांसाठी ईपीएफओ कडून नवीन प्रणाली सुरू करण्यात येणार आहे.

EPFO 3.0 असे या नव्या प्रणालीला नाव देण्यात आले असून यामुळे पीएफ मधील पैसे काढणे सोपे होणार आहे. आता पीएफचे पैसे काढण्यासाठी कोणत्याही कार्यालयात फेऱ्या मारण्याची आवश्यकता राहणार नसल्याचा दावा केला जातोय.
ही प्रणाली सुरू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना थेट एटीएम मशीन किंवा यूपीआय अॅप्सच्या माध्यमातून पीएफचे पैसे काढता येणार आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांचा बहुमूल्य वेळ वाचणार आहे.
नव्या सुविधामुळे कर्मचाऱ्यांना पीएफ मधील पैसे काढण्यासाठी जास्त कागदपत्रांची पण गरज राहणार नाही. खरेतर, गेल्या काही महिन्यांपासून EPFO 3.0 बाबत चर्चा सुरू होती. जून महिन्यात ही सुविधा लागू होणार होती.
पण काही तांत्रिक कारणांमुळे जून महिन्यात ही सुविधा सुरू झाली नाही. आता पुढील महिन्यात याबाबत अंतिम निर्णय होणार आहे. श्रम व रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली 10-11 ऑक्टोबरला एक महत्त्वाची बैठक होणार आहे.
सदर बैठकीत या प्रस्तावावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. दिवाळीपूर्वीच ही नवीन सुविधा कार्यान्वित करण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे. या नव्या प्रणालीद्वारे पीएफ खातेदारांना बँकिंगसारखी डिजिटल सुविधा मिळणार आहे.
यामुळे पैसे काढणे, ट्रान्सफर करणे आणि क्लेम करणे ही सर्व प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन केली जाणार आहे. विशेष म्हणजे, सदस्यांना एटीएम सोबतच गुगल पे, फोन पे आणि पेटीएम सारख्या यूपीआय अॅप्सद्वारेदेखील PF चे पैसे काढता येणार आहेत.
अॅपवर मिळणार संपूर्ण माहिती
EPFO 3.0 मुळे सदस्यांना त्यांच्या खात्यातील बॅलन्स, मासिक कॉन्ट्रीब्युशन, तसेच व्याजदराची अद्ययावत माहिती फक्त एका क्लिकवर मिळणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचा बहुमूल्य वेळ तर वाचणारच आहे शिवाय पारदर्शकता वाढेल. सरकारचा हा निर्णय करोडो कर्मचाऱ्यांच्या फायद्याचा राहील.