Sarkari Yojana:- समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून अनेक महत्त्वाच्या अशा योजना राबवल्या जात आहेत व या योजनांच्या माध्यमातून व्यवसाय उभारण्याकरिता अनुदान स्वरूपात किंवा कर्ज स्वरूपात आर्थिक मदत मिळत असल्याने अनेक लोकांना आता स्वतःचा व्यवसाय सुरू करता येणे शक्य झाले आहे व या व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होण्याच्या दिशेने वाटचाल करणे सोपे झाले आहे.
यासोबतच ग्रामीण भागातील महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी देखील महत्वाच्या योजना राबवल्या जात आहे.अशीच एक योजना कोल्हापूर जिल्ह्यात राबवली जात असून या योजनेचे नाव मकान किराणा योजना आहे. विशेष म्हणजे राज्यात पहिल्यांदा ही योजना राबवण्यात येत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकाराने 2025-26 या आर्थिक वर्षात ही योजना सुरू होणार आहे व या माध्यमातून महिलांना पक्के घरकुल मिळणार आहे व स्वतःचे किराणा दुकान देखील सुरू करता येणार आहे.

किराणा दुकान सुरू करण्यासाठी सरकार देईल 30 हजारांची मदत
ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक दृष्ट्या समृद्ध करण्याच्या दृष्टिकोनातून कोल्हापूर जिल्ह्यात मकान किराणा योजना सुरू करण्यात आलेली आहे व या योजनेतून आता महिलांना पक्के घरकुल मिळणार आहे व त्यासोबतच स्वतःच्या किराणा व्यवसाय सुरू करता येणार आहे.
किराणा व्यवसाय सुरू करण्यासाठी महिलांना थेट तीस हजार रुपयांची आर्थिक मदत या योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळे महिलांना रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की ही योजना महिलांसाठी घरकुला पुरती मर्यादित नसून उत्पन्नाचा एक स्थिर स्त्रोत निर्माण करण्यासाठी महत्वाची आहे.
या योजनेचे निकष काय?
या योजनेत दारिद्र्य रेषेखालील महिलांना विशेष प्राधान्य दिले जाणार आहे. या योजनेतून मिळणारे घरकुल हे महिलेच्या नावावर असणे बंधनकारक आहे. घरकुलाचे काम शंभर टक्के पूर्ण होईल व त्यानंतरच किराणा व्यवसायासाठी सरकार आर्थिक मदत देणार आहे. लाभार्थी महिलेने सरकारच्या मदतीतून सुरू केलेले किराणा दुकानाचा व्यवसाय कमीत कमी तीन वर्ष चालवणे गरजेचे आहे. दुकान सुरू केल्याचे गटविकास अधिकारी आणि स्थानिक अधिकाऱ्यांकडून प्रमाणपत्र घेणे मात्र अनिवार्य असणार आहे.