Job Loss Insurance:- सध्या जर आपण खाजगी क्षेत्रातील नोकऱ्यांची स्थिती बघितली तर त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अनिश्चिततेचे सावट असल्याचे दिसून येत आहे. सध्या बऱ्याच क्षेत्रांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात AI चा वापर होऊ लागल्याने मागील काही महिन्यांमध्ये अनेक नामांकित कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. या पद्धतीने जर अचानकपणे नोकरी गेली तर मात्र घेतलेल्या कर्जाचे हप्ते आणि इतर घर खर्च या बाबतीत खूप मोठ्या आर्थिक समस्या निर्माण होतात व त्यामुळे व्यक्ती तणावाखाली येऊ शकतो. अशीच भीती तुम्हाला देखील तुमच्या नोकरीबद्दल असेल तर तुम्हाला जॉब लॉस इन्शुरन्स किंवा उत्पन्न संरक्षण विमा घेणे अत्यंत गरजेचे आहे. चला तर मग यास इन्शुरन्स विषयीची माहिती आपण या ठिकाणी बघू.
जॉब लॉस इन्शुरन्सचे स्वरूप काय?
जॉब लॉस इन्शुरन्स हा एक महत्त्वाचा विम्याचा प्रकार असून जर अचानकपणे नोकरी गेली तर अशा आर्थिक संकटावेळी हा विमा खूप मोठ्या प्रमाणावर मदत करतो. तुम्हाला हा विमा स्वतंत्रपणे घेता येत नाही. यामध्ये तुम्ही जर होम लोन, वाहन कर्ज किंवा इतर कुठलीही कर्ज घेतले असेल तर त्या कर्जासोबत ॲड ऑन म्हणून घ्यावा लागतो. तुमची अचानक नोकरी गेली तर तुम्ही घेतलेल्या कर्जाचे हप्ते अगदी वेळेवर भरले जावेत व तुमचा सिबिल स्कोर खराब होऊ नये याकरिता हा विमा खूप फायद्याचा ठरतो.

तुम्ही जर होमलोन किंवा कार लोन किंवा पर्सनल लोन घेतले असेल व त्याचे हफ्ते तुम्ही भरत असाल व अचानक तुमची नोकरी गेली तर या विमा पॉलिसीनुसार संबंधित विमा कंपनी तुमच्या कर्जाच्या हप्ते काही ठराविक महिन्यांसाठी भरते. साधारणपणे तीन ते सहा महिन्यांपर्यंत विमा कंपनी तुमचे कर्जाचे हप्ते भरू शकते. त्यामुळे नक्कीच तुम्हाला आर्थिक संकटात दिल्यास मिळू शकतो.
जर हा विमा घ्यायचा असेल तर जेव्हा तुम्ही कर्ज घ्याल तेव्हाच तुम्हाला हा घेता येऊ शकतो. जॉब लॉस इन्शुरन्स हा अनेक बँका आणि नॉन बँकिंग फायनान्स कंपनी अर्थात एनबीएफसीच्या माध्यमातून ऍड ऑन म्हणून दिला जातो. तसेच काही विमा कंपन्या हा विमा स्वतंत्रपणे देखील विकतात व अशावेळी तुम्हाला एक प्रीमियम भरावा लागतो जो तुमच्या कर्जाची रक्कम आणि विम्याचे मुदत किती आहे यावर अवलंबून असतो.
या विम्याचा फायदा कधी होत नाही?
जॉब लॉस इन्शुरन्स हा पगारदार व्यक्तींसाठी आहे आणि जे पूर्णवेळ नोकरी करतात अशा लोकांसाठी खास करून फायद्याचा आहे. परंतु काही गैरशिस्त किंवा तुम्ही स्वतःहून नोकरीचा राजीनामा दिला व त्यामुळे तुमची नोकरी गेली असेल तर तुम्हाला या विम्याचा फायदा मिळत नाही. परंतु कंपनीने तुम्हाला कामावरून काढून टाकले किंवा कंपनीच बंद झाली तर अशा प्रसंगी या विम्याचा फायदा तुम्हाला मिळतो.