Shetkari Yojana: पिकांना बसवा प्लॅस्टिक कव्हर आणि गारपीटी पासून करा पिकांचे रक्षण! सरकार देते 50% अनुदान

Published on -

Shetkari Yojana:- दरवर्षी गारपीट आणि अवकाळी पाऊस किंवा वादळी वारे इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे आणि त्यातल्या त्यात फळ पिकांचे अतोनात नुकसान होते. त्या नुकसानीमुळे बऱ्याचदा शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास हिरावला जातो व मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो. अशा नैसर्गिक आपत्ती पासून पिकांचे संरक्षण व्हावे याकरिता आता पिकांसाठी प्लास्टिक कव्हर तंत्रज्ञान महत्वाचे ठरत आहे व सरकार देखील पिकांसाठी प्लास्टिक कव्हर बसवण्याकरिता अनुदान देत आहे व त्यामुळे नक्कीच शेतकऱ्यांना याचा खूप मोठा फायदा होताना दिसून येत आहे. चला तर मग या लेखात आपण प्लास्टिक कव्हर अनुदान योजनेविषयी थोडक्यात माहिती बघू.

प्लास्टिक कव्हर अनुदान योजनेचे स्वरूप

याबाबत सविस्तर वृत्त असे की, राज्य सरकारच्या माध्यमातून प्लास्टिक कव्हर अनुदान योजना सुरू करण्यात आलेली आहे. अवकाळी पाऊस, गारपिटी सारखे नैसर्गिक आपत्तींपासून पिकांचे संरक्षण करण्याकरिता राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. प्लास्टिक कव्हर अनुदान योजनेच्या माध्यमातून प्लास्टिक कव्हर बसवण्यासाठी जो काही एकूण खर्च लागतो त्या खर्चाच्या 50% रक्कम हे सरकार अनुदान म्हणून देते. या प्लास्टिक कव्हरचे फायदे जर बघितले तर पिकांचे नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण होते व उच्च प्रतीच्या फळ पिकांचे उत्पादन मिळण्यास मदत होते.

याकरिता अर्ज करताना लागणारी कागदपत्रे

तुम्हाला देखील प्लास्टिक कव्हर अनुदान योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अर्ज करताना तुमच्याकडे काही कागदपत्रे असणे आवश्यक आहे. या कागदपत्रांमध्ये ॲग्री स्टॅक फार्मर आयडी, आधार कार्डची छायांकित प्रत, आधार संलग्न बँक खात्याच्या पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत, अर्जदार अनुसूचित जाती/ जमातीतील असेल तर जातीचे प्रमाणपत्र, विहित नमुन्यातील हमीपत्र, बंधपत्र तसेच चतु:सीमा नकाशा इत्यादी कागदपत्र असणे गरजेचे आहे.

या योजनेच्या अटी काय?

प्रत्येक योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्याप्रमाणे काही अटी असतात अगदी तशाच अटी या योजनेसाठी असून यातील पहिली अट म्हणजे अर्जदार शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे गरजेचे आहे.तसेच एका शेतकऱ्याला 20 गुंठे ते एक एकर क्षेत्रासाठी हे अनुदान मिळते. शेतकरी हा डाळिंब किंवा द्राक्ष उत्पादक असावा व त्याच्याकडे वीस गुंठे ते एक एकर इतके क्षेत्र असावे. तसेच गारपिट व अवकाळी पावसामुळे जे काही नुकसान होते त्या नुकसानी पासून पिकांचे संरक्षण करणे हा शेतकऱ्याचा प्रामुख्याने उद्देश असणे गरजेचे आहे.

अर्ज कुठे कराल?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे गरजेचे आहे. तसेच अधिकच्या माहितीसाठी तुम्ही https://krishi.maharashtra.gov.in या वेबसाईटला भेट देऊन माहिती घेऊ शकतात किंवा कृषी विभाग कार्यालयाशी संपर्क साधू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News