Financial Planning:- व्यक्तीचे वय जसे जसे वाढत जाते तसे तसे त्याच्यावरील कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढत जातात व अशा जबाबदाऱ्या पार पाडताना उत्कृष्ट आर्थिक नियोजन खूप मोठ्या प्रमाणावर कामाला येते. या वयामध्ये जर थोडी जरी चूक केली तरी देखील एक मोठी आर्थिक समस्या तुमच्यापुढे उभी राहू शकते. त्यामुळे आर्थिक नियोजन करताना जोखीम व्यवस्थापनाला या वयाच्या टप्प्यामध्ये खूप महत्त्व आहे. याच पद्धतीने तुम्ही देखील वयाच्या 40 च्या आसपास असाल तर तुम्ही आर्थिक दृष्टिकोनातून समृद्ध राहण्यासाठी जोखीम व्यवस्थापन कसे करावे त्याबद्दलची थोडक्यात माहिती या लेखात घेऊ.
40 व्या वर्षी जोखीम कशी हाताळाल?
जोखीम व्यवस्थापन म्हणजे तुमची कमाई तसेच आरोग्य, कर्ज आणि भविष्य यावर परिणाम करणारे कोणते धोके आहेत ते धोके ओळखण्याला महत्त्व दिले जाते व त्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी तुमची तयारी कशा पद्धतीने तुम्ही कराल हे यामध्ये अभिप्रेत असते. त्या दृष्टिकोनातून जोखीम व्यवस्थापन करताना….

1- यामध्ये तुम्ही जोखीम ओळखणे खूप महत्त्वाचे असून यात तुम्ही तुमच्या आयुष्यातील कोणत्या गोष्टी तुमच्या आर्थिक परिस्थितीचे नुकसान किंवा हानी करू शकतात याचा विचार करावा. यामध्ये प्रामुख्याने अचानक उद्भवलेले आजारपण किंवा कमाईचे स्त्रोत कमी होणे किंवा कर्जाचा बोजा वाढणे या गोष्टींचा समावेश होतो.
2- तसेच तुम्ही आपत्कालीन निधी म्हणून कमीत कमी सहा महिन्याच्या खर्चासाठी पैसे वाचवणे खूप गरजेचे आहे. कारण अचानकपणे तुमची नोकरी गेली किंवा इतर काही समस्या उद्भवली तर तुम्हाला आरामात विचारपूर्वक पुढचा निर्णय घेता येतो व आर्थिक समस्या राहत नाही.
3- तसेच तुमचे आर्थिक उत्पन्न थांबले तर कुटुंबावर आर्थिक संकट कोसळू शकते. या संदर्भाने तुम्ही तुमची कमाई सुरक्षित ठेवणे खूप गरजेचे आहे व यासाठी दीर्घकालीन जीवन विमा घेऊन ठेवावा. जो अशा परिस्थितीमध्ये तुमच्या कमाईचा आधार असतो.
4- घरात कुणाला किंवा स्वतःला कोणता आजार कधी उद्धवेल याची कुठल्याही प्रकारची शाश्वती नसते व सध्याचे उपचार अतिशय महाग असल्याने यामुळे खूप आर्थिक ताण येऊ शकतो. त्यामुळे तुम्ही चांगल्या आरोग्यसह स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबाचे संरक्षण करणे गरजेचे आहे. जेणेकरून वैद्यकीय खर्चामुळे तुमची बचत वाया जात नाही आणि विम्यामुळे तुमच्या कुटुंबाचे रक्षण होते.
5- तुमचे स्वप्न आणि तुमची बचत यांना एकत्र होऊ देऊ नका. घराची खरेदी करणे तसेच मुलांचे शिक्षण, सेवानिवृत्ती इत्यादी मोठ्या उद्दिष्टासाठी स्वतंत्रपणे बचत करणे गरजेचे आहे. तुमचे जर आयुष्यात काही मोठे स्वप्न असतील तर ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही नियमित गुंतवणूक करणे गरजेचे आहे.
6- तसेच तुमच्या कर्जावर नियंत्रण ठेवणे अतिशय गरजेचे आहे.तुमच्यावर किती कर्जाचे थकबाकी आहे व त्याचा व्याजदर किती आहे आणि ते कोणत्या कालावधीत फेडायचे आहे याचे नियोजन करा व महागडे कर्ज असेल तर ते लवकर फेडण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे.
7- दरवर्षी तुम्ही काढलेला विमा तसंच केलेली गुंतवणूक आणि कागदपत्रे रिव्ह्यू करून घेणे खूप गरजेचे आहे. जेणेकरून कागदपत्रांच्या बाबतीत देखील तुमचे संरक्षण हे कायम राहते. कुठलेही आर्थिक संकट कोसळले तरी वेळेवर तुम्हाला त्रास सहन करावा लागत नाही.