Pune News : पुण्यातील जनतेसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. दिवाळी आणि छठपूजेच्या काळातील प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा विचार करून पुणेकरांसाठी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता मध्य रेल्वेतर्फे पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक विशेष तयारी करण्यात आली आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) आणि नागपूर दरम्यान अतिरिक्त वातानुकूलित सुपरफास्ट विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या गाडीला जळगाव आणि भुसावळ स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे, ज्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांनाही याचा लाभ होणार आहे.

दिवाळी व छठ पूजेच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना सुरक्षित आणि सुलभ प्रवासाची सुविधा देण्यासाठी मध्य रेल्वेने तब्बल १,७०२ विशेष गाड्या चालविण्याची घोषणा केली आहे. या गाड्या मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर यांसारख्या प्रमुख स्थानकांमधून सुटतील आणि उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल तसेच ईशान्येकडील राज्यांकडे धावतील. त्यापैकी ८०० पेक्षा अधिक गाड्या थेट उत्तर भारतातील राज्यांकडे रवाना होतील.
प्रवाशांच्या सोयीसाठी अतिरिक्त तिकीट खिडक्या, होल्डिंग एरिया, तसेच पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, चार्जिंग पॉइंट्स आणि खाद्यपदार्थांची दुकाने यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे १,२०० चौ.मी. तर लोकमान्य टिळक टर्मिनस येथे १०,००० चौ.मी. क्षेत्रफळाचे विशेष होल्डिंग क्षेत्र तयार करण्यात आले आहे.
तसेच पुणे, नाशिक रोड आणि नागपूर स्थानकांवरही तात्पुरती व्यवस्था करण्यात आली असून एकूण २० हजार प्रवाशांना एकावेळी थांबता येईल.
दरम्यान, गाडी क्रमांक ०१००५ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून शनिवारी पहाटे ००.२० वाजता सुटून नागपूर येथे दुपारी ०३.३० वाजता पोहोचेल, तर गाडी क्रमांक ०१००६ नागपूरहून सायंकाळी ०६.१० वाजता सुटून मुंबईत दुसऱ्या दिवशी सकाळी ०८.२५ वाजता येईल. दोन्ही गाड्यांमध्ये २० वातानुकूलित तृतीय श्रेणी डबे आणि दोन जनरेटर व्हॅन असतील.
आरक्षणाची सुविधा सर्व संगणकीकृत केंद्रांवर तसेच IRCTC संकेतस्थळावर उपलब्ध आहे. मध्य रेल्वेने प्रवाशांना चुकीच्या अफवांपासून दूर राहण्याचे आणि अधिकृत स्त्रोतांवरूनच माहिती घेण्याचे आवाहन केले आहे.













