श्रीरामपूर- तालुक्यात सध्या एक गंभीर आणि नव्याने उद्भवणारी आरोग्य समस्या पुढे आली आहे ती म्हणजे लहान मुलांमधील लठ्ठपणा. जिथे पूर्वी कुपोषण हे सर्वात मोठं आरोग्य संकट मानलं जात होतं, तिथे आता त्याचं स्थान लठ्ठपणाने घेतलं आहे. बालविकास प्रकल्पाच्या आकडेवारीनुसार, १५ हजाराहून अधिक बालकांपैकी सुमारे १० टक्के मुले लठ्ठ गटात येतात बाब निश्चितच चिंतेची आहे.
कुपोषणात घट
२०१८ पासून राबविण्यात आलेल्या पोषण अभियानामुळे कुपोषणाच्या बाबतीत लक्षणीय घट झाली आहे. कुपोषित मुलांची संख्या फक्त १७३ आहे, तर अतिकुपोषित केवळ ९ बालके आहेत. ही नक्कीच सकारात्मक बाब आहे. मात्र, दुसरीकडे १,४५१ मुले लठ्ठ गटात आढळून आली, ज्यात ७११ मुले अतिलठ्ठ आहेत. विशेष म्हणजे, काही केवळ ५ वर्षांचे मुलांचे वजन ३० किलोच्या आसपास मोजले गेले – जे त्यांच्या वयानुसार अत्यंत जास्त आहे.

फास्टफूडचे दुष्परिणाम
लठ्ठपणामागे प्रमुख कारणे म्हणजे जंकफूड व फास्टफूडचे वाढलेले सेवन, कमी शारीरिक हालचाल, स्क्रीन टाइम वाढणे (मोबाईल, टीव्ही), पौष्टिक आहाराचा अभाव, पालकांमध्ये आहारविषयी जागरूकतेचा अभाव या सवयींमुळे लहान वयातच लठ्ठपणा, हृदयरोगाचे संभाव्य धोक्यांचे संकेत मिळू लागले आहेत.
पालकांसाठी आहार मार्गदर्शन
बालविकास प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी लठ्ठ बालकांच्या आहारात काही महत्त्वाचे बदल सुचविले आहेत. फास्टफूड ऐवजी घरी तयार केलेले पौष्टिक पदार्थ: शेवग्याची थालीपीठ, कोथिंबीर वड्या भरडधान्यांचा समावेश, ज्वारी, बाजरी, नाचणी, कृत्रिम साखर व पॅकबंद पदार्थांना फाटा, नियमित व्यायाम आणि खेळ यांना प्राधान्य देण्याचे सांगितले आहे.
उपाययोजना करणे गरजेचे
लठ्ठपणाचे परिणाम केवळ शरीरावरच नव्हे, तर मानसिक विकासावरही होतात. मुलांचे आत्मविश्वास, एकाग्रता, सामाजिक संवाद अशा अनेक बाबींवर याचा परिणाम होतो. त्यामुळे आजच्या परिस्थितीत फक्त उपाय नव्हे, तर प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देणे ही काळाची गरज आहे.
जसे कुपोषणाविरोधात प्रयत्न यशस्वी झाले, तसेच लठ्ठपणाच्या दिशेनेही तितक्याच गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. फक्त जेवण देणं नव्हे, तर संतुलित आणि गरजेप्रमाणे योग्य आहार देणं हेच खरे आरोग्यदायी बालपण घडविण्याचे पाऊल ठरेल