नगर-तालुक्यातील गोशाळांना गोवंशीय पशुधनासाठी मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या माध्यमातून देशी गायींचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी अनुदान मंजूर करण्यात आले आहे. याअंतर्गत तालुक्यातील नऊ गोशाळा पात्र ठरल्या असून, 1,059 गोवंशीय पशुधनांसाठी तब्बल 50 लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे.
राज्यात गोसंवर्धनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र गोसेवा आयोगामार्फत विविध योजना राबविल्या जातात. देशी गायींचे संवर्धन, शेती आणि पर्यावरण संरक्षण याला गती देण्यासाठी गोशाळांना आर्थिक मदत दिली जाते. त्यानुसार, आयोगाच्या निकषात पात्र ठरलेल्या गोशाळांना प्रति जनावर दररोज 50 रुपये याप्रमाणे तीन महिन्यांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. जानेवारी ते मार्च 2025 या कालावधीसाठी हे अनुदान वितरित करण्यात आले आहे.

अनुदानासाठी पात्र गोशाळांच्या प्रस्तावांची तपासणी पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आली. त्यानंतर जिल्हा गोशाळा पडताळणी समितीने पाहणी करून अंतिम यादी जाहीर केली. राज्यात एकूण 560 गोशाळांना अनुदानासाठी पात्र ठरविण्यात आले असून, त्यासाठी एकूण 25 कोटी 45 लाख 60 हजार 500 रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे.
नगर तालुक्यातील पात्र नऊ गोशाळांमध्ये 47 लाख 65 हजार 500 रुपये त्यांच्या बँक खात्यांमध्ये वर्ग करण्यात आले आहेत. या अनुदानामुळे गोशाळांना देशी गायींच्या देखभालीसाठी मदत होणार आहे. विशेषतः गोवंशीय पशुधनासाठी खाद्य, निवारा आणि वैद्यकीय सेवांसाठी हे अनुदान उपयुक्त ठरणार आहे.
अनुदान वितरण प्रक्रियेत पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी, पशुधन विकास अधिकारी, पर्यवेक्षक आणि तांत्रिक कर्मचारी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तसेच, जिल्हा पातळीवरील विविध अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करून गोशाळांना आवश्यक सहकार्य केले आहे. यामुळे नगर तालुक्यातील गोशाळांना अनुदान मिळविण्यासाठी मोठी मदत झाली आहे.
नगर तालुक्यातील नऊ गोशाळांना अनुदान देण्यात आले असून, त्यामध्ये खालील गोशाळांचा समावेश आहे:
काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्ट, आगडगाव
श्री माऊली कृपा गोशाळा, पिंपळगाव कौडा
श्री निसर्गसृष्टी गोशाळा, इसळक
श्री लक्ष्मी गोशाळा, गुंडेगाव
श्री सुदर्शन गोशाळा, गुंडेगाव
श्री गोरक्षनाथ गड देवस्थान ट्रस्ट, मांजरसुंबा गड
श्री माऊली स्वदेशी गोशाळा, नागरदेवळे
श्री अरुणोदय गोशाळा, अहिल्यानगर
पांजरपोळ गोरक्षण संस्था, नगर
तालुक्यात अजूनही काही गोशाळा कार्यरत असल्या तरी, त्या अधिकृत नोंदणी किंवा आवश्यक कागदपत्रांच्या अभावामुळे अनुदानापासून वंचित राहिल्या आहेत. त्यामुळे भविष्यात गोशाळांनी आवश्यक दस्तऐवज पूर्ण करून अनुदानासाठी अर्ज करावा, अशी सूचना करण्यात आली आहे.
राज्यातील पशुधन संवर्धन आणि गोसेवा यासाठी महाराष्ट्र गोसेवा आयोग सातत्याने प्रयत्नशील आहे. या अनुदानामुळे गोशाळा चालविणाऱ्या संस्था, गोसेवक आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. भविष्यात अशा योजनांचा लाभ घेण्यासाठी गोशाळांनी आवश्यक निकष पूर्ण करण्याची गरज आहे. राज्यातील गायींचे संरक्षण आणि संवर्धन अधिक चांगल्या प्रकारे करता यावे, यासाठी शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.