Ahilyanagar News: अहिल्यानगर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त २९ एप्रिल रोजी चोंडी येथे प्रथमच मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या विशेष प्रसंगासाठी जिल्हा प्रशासनाने जोरदार तयारी सुरू केली असून, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री आणि आमदारांसह व्हीव्हीआयपी पाहुण्यांसाठी खास खानदेशी आणि मराठवाडी पदार्थांचा मेन्यू तयार करण्यात आला आहे. यामध्ये शिपी आमटी, पुरणपोळी, डाळबट्टी, हुलग्याचे शेंगुळे, मासवडी, शिंगोरी आमटी आणि आमरस चपाती यासारख्या वैशिष्ट्यपूर्ण पदार्थांचा समावेश आहे.
३०० व्हीव्हीआयपी पाहुण्यांसाठी जेवण
व्हीव्हीआयपी पाहुण्यांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, कॅबिनेट आणि राज्यमंत्री, तसेच विविध विभागांचे सचिव, आयुक्त आणि वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत. जिल्हा प्रशासनाने ३०० व्हीव्हीआयपी पाहुण्यांसाठी जेवणाची व्यवस्था केली आहे, तर इतर २,००० कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी केटरिंग सेवेची मदत घेतली जाणार आहे. या बैठकीसाठी स्थानिक स्वाद आणि संस्कृती दर्शवणारे १५ ते २० पारंपरिक पदार्थ तयार करण्याचे नियोजन आहे.

बचत गटांच्या महिलांवर जबाबदारी
जिल्ह्यातील विविध बचत गटांच्या महिलांना जेवण तयार करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. यासंदर्भात मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बचत गटांच्या प्रतिनिधींसोबत बैठक होणार आहे. या बैठकीत पदार्थांचे वाटप, थाळीचे दर, प्रवास खर्च आणि आवश्यक सुविधांबाबत चर्चा होऊन निर्णय घेतले जाणार आहेत. बचत गटांना जेवण तयारीसाठी ठराविक रक्कम आणि चोंडीपर्यंतचा प्रवास खर्च शासनाकडून दिला जाईल.
पदार्थांचा मेन्यू
जिल्हा प्रशासनाने स्थानिक खाद्यसंस्कृतीला साजेसे पदार्थ निवडले आहेत. यामध्ये शिपी आमटी, थालीपीठ, कुरडई, मासवडी, हुरडा थालीपीठ, वांग्याचे भरीत, मटकी, मसाला वांगे, बाजरी भाकरी, दही-धपाटे, कोथिंबीर वडी, शेवगा भाजी, भात, मांडे, आलू वडी, मूग भजी, बीट थालपीठ, वांगी भरीत भाकरी आणि म्हैसूर बोंडा यांचा समावेश आहे. हे पदार्थ स्थानिक वैशिष्ट्ये आणि चव यांचे प्रतिनिधित्व करतात.
या बैठकीसाठी जेवणाची जबाबदारी सांभाळणाऱ्या बचत गटांना प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाणार आहे. हा उपक्रम केवळ स्थानिक खाद्यसंस्कृतीला प्रोत्साहन देणार नाही, तर बचत गटातील महिलांना आर्थिक संधी उपलब्ध करून देईल. तसेच चोंडी येथील बैठकीदरम्यान व्हीव्हीआयपी पाहुण्यांना स्थानिक चवींचा आनंदही यानिमित्ताने घेता येईल.