Ahmednagar News : अहमदनगरमधील शेतकऱ्याची कमाल, मुरमाड जमिनीवर फुलविले ‘ड्रॅगन फ्रूट’

Published on -

Ahmednagar News : सध्या निसर्गाचा लहरीपणा, पावसाचे कमी झालेले प्रमाण, दुष्काळाचे संकट आदी गोष्टींमुळे सध्या तरुणाई शेतीकडे पाठ फिरवताना दिसते. परंतु सध्या असेही काही प्रयोगशील शेतकरी आहेत की जे शेतात नवनवीन प्रयोग करत आहेत. आजच्या तरुणाईसाठी आदर्श ठरेल असे एक उदाहरण अहमदनगर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने प्रस्थापित केले आहे.

या शेतकऱ्याने दुष्काळात देखील मुरमाड जमिनीत ‘ड्रॅगन फ्रूट’ फुलवण्याची कमाल केली आहे. प्रभाकर चांगदेव कदम असे या शेतकऱ्याचे नाव असून ते संगमनेर तालुक्यातील लोहारे येथील रहिवासी आहेत.

कदम यांनी आपल्या जमिनीतीलं ५५ गुंठे क्षेत्रात ड्रॅगन फ्रूट शेती केली असून उत्तम पद्धतीने फुलविली आहे. त्यांनी शेतात तीन हजार २०० ड्रॅगन फ्रूट झाडांची लागवड केली. बाजारात ड्रॅगन फ्रूटला चांगली मागणी आहे.

त्यामुळे आता यातून चांगल्या पद्धतीचे उत्पन्न मिळेल अशी त्यांना अपेक्षा आहे. दुष्काळी परिस्थितीत मुरमाड जमिनीत नावीन्यपूर्ण पद्धतीने केलेली ड्रॅगन फ्रूट लागवड कौतुकाचा विषय ठरला आहे.

कसे केले नियोजन ?
शेततळ्यातील उपलब्ध पाण्याचा ठिबक पद्धतीचा वापर करून बाग फुलविली. त्यासाठी दोन फूट खोल बाय सहा इंच खोल खड्डा घेऊन त्यात सिमेंटचे सहा फूट उंचीचे ८०० खांब उभे केले शेतात १० बाय सात अंतरावर ८०० सिमेंट खांब उभे करून एका सिमेंट खांबास चार झाडे लावण्यात आली.

५० रुपये दराने रोपे आणून तीन हजार २०० झाडांची लागवड केली. त्यात ड्रॅगन सी, जम्बो रेड, वेतनाम जंबू, साधे रेड, अशा चार प्रकारच्या जातीच्या ड्रॅगन फ्रूट रोपांची लागवड केली. ड्रॅगन फ्रूटची लागवड केल्यास एक झाड २५ ते ३० वर्षे उत्पादन मिळते. ड्रॅगन झाडांवर बुरशीनाशक व कीटकनाशक फवारे वापरले.

झाडांना फुले लागल्यानंतर साधारणपणे ४५ दिवसांत फळे विक्रीस येतात. जून ते डिसेंबर या काळात एका झाडास १० ते १२ किलो फळ लागते. एकरी १० ते १२ टन इतके उत्पन्न मिळते. त्यासाठी एकरी पाच लाख रुपये खर्च येतो असे शेतकरी प्रभाकर कदम यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News