Ahmednagar News : पावसाळ्यात विजांपासून स्वतःचा कसा बचाव कराल? घ्या ‘ही’ काळजी

Published on -

Ahmednagar News : राज्यात गेल्या काही दिवसांपासून वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला आहे. दरवर्षी वीज पडून अनेक नागरिकांसह जनावरांचादेखील बळी जातो. त्यामुळे वादळी वाऱ्यात विजांपासून बचाव करण्यासाठी काळजी घेण्याची गरज आहे. शक्यतो वादळी वाऱ्याचा आधीच अंदाज घेऊन लवकरात लवकर घरी जाणं कधीही सुरक्षित आहे.

मान्सूनच्या पार्श्वभूमिवर राज्यभरात जोरदार वादळी पाऊस होत आहे. अनेक ठिकाणी विजादेखील पडत आहेत. काही ठिकाणी वीज पडून काही नागरिकांचा मृत्युही झाला आहे. वादळी वाऱ्यांसह पाऊस सुरू असल्यास शक्यतो बाहेर पडणे टाळावे; मात्र वादळ सुरू असतानाच बाहेर असलात, तर वीज अंगावर पडू नये, याची काळजी घेणे गरजेचे आहे.

वीज कोसळण्याची लक्षणे काय असतात, याचीही माहिती ठेवणे गरजेचे आहे. कारण दरवर्षी वीज कोसळून जीवित व वित्त हानी होत असते. घरातून बाहेर पडताना पावसाचा अंदाज घेऊनच कामाचे नियोजन करावे. वादळी वारे आणि विजांचा कडकडाट होत असेल, तर अशा स्थितीत घराबाहेर पडू नये. तुम्ही घराबाहेर असाल तर सुरक्षित स्थळी जावे. खास करून एखाद्या बंद इमारतीत, घरात किंवा गुहासदृश ठिकाणी तुम्ही आसरा घेऊ शकता.

जर तुम्हाला अशी जागा सापडली नाही, तर उंच असलेल्या ठिकाणी थांबणे टाळा. विशेष करून विद्युत पोल, झाडे, पत्र्याचे शेड या ठिकाणी जाणे टाळावे. कारण या गोष्टी विजेला स्वतःकडे आकर्षित करत असतात. वादळी वारे सुरू असताना, घरांच्या खिडक्या, दरवाजे बंद करा, तसेच घरातील विद्युत उपकरणेदेखील बंद करून ठेवा. तुम्ही कारमध्ये असाल तर गाडीच्या काचादेखील बंद करून ठेवा. गाडीच्या बाहेर येऊ नका. कारण चारचाकी वाहन आपल्याला विजेपासून सुरक्षित ठेवतं.

तुम्ही बाहेर असाल आणि तुमच्या अंगावरील केस उभे राहिले असल्याचे तुम्हाला जाणवत असल्यात किंवा त्वचेला मुंग्या येणे, झिणझिण्या जाणवल्यास तुमच्यावर वीज कोसळू शकते. अशा वेळी डोके गुडघ्यात घालून खाली बसावे. प्रामुख्याने धातुंच्या वस्तूंपासून दूर राहा. धरणे, तलाव व इतर पाण्याच्या ठिकाणांपासूनदेखील लांब रहा. विजा चमकत असताना मोबाईल फोनचा वापर टाळा.

तुम्ही जर अनेकजण एकत्र असाल तर एकमेकांपासून दूर व्हा. दुचाकी, ट्रॅक्टरमध्ये असाल तर तातडीने प्रवास थांबवावा आणि सुरक्षित ठिकाणी जा.वादळी वारे सुरू असल्यास आधी घराचे दरवाजे नीट बंद करून घ्या. यावेळी घराबाहेर पडणे टाळा. घराच्या खिडक्या, दारे यापासून लांब राहा. टीव्ही, विद्युत उपकरणे वापरू नका. विजा चमकत असताना घरात हेयर ड्रायर, विद्युत टुथब्रश, विद्युत रेझर ही विद्युत उपकरणे वापरणे टाळा. टेलिफोन आणि मोबाइल वापरणेदेखील टाळा. अशी काळजी घेतल्यास विजांपासून वाचणे सहज शक्य आहे.

शेतकऱ्यांनी घ्यावी ‘ही’ विशेष काळजी

शेतकऱ्यांना उन्हाळा, पावसाळा अन हिवाळा या तिन्ही ऋतूत शेतात काम करावे लागते. त्यामुळे पावसाळ्यात विजांपासून बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. यात तुम्ही शेतात काम करत असाल तर तात्काळ सुरक्षित ठिकाणी जा. शक्य न झाल्यास दोन्ही पाय गुडघ्याजवळ घेऊन खाली बसून हात कानावर ठेवा. तुमचा जमिनीशी कमीत कमी संपर्क कसा यईल याची काळजी घ्या. तिथे पायाखाली कोरडे लाकूड, प्लास्टिक गोणपाट, कोरडा पालापाचोळा ठेवा. मोबाईलचा वापर टाळा. पायाव्यतिरीक्त शरीराचा कुठलाही भाग जमिनीला स्पर्श होणार नाही, याची काळजी घ्या. ओल्या ठिकाणाऐवजी कोरड्या ठिकाणी थांबावे, मोकळ्या मैदानात उभे राहू नका.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News