अहमदनगरमध्ये दूध तापले ! रखरखत्या उन्हात शेतकरी रस्त्यावर, दर न मिळाल्यास विधानसभेला दणका देणार

मागील अनेक महिन्यांपासून दुधाचे भाव कोसळले आहेत. त्यामुळे शतकऱ्याचे आर्थिक बजेट पूर्णतः कोलमडलेले आहे. तसेच दुधाला अनुदान देण्याची घोषणा ही केवळ कागदावरच राहिली असल्याने शेतकऱ्यांत असंतोष आहे. आता याचे रूपांतरण आंदोलनात झाले आहे

Pragati
Published:
doodh

Ahmednagar News : मागील अनेक महिन्यांपासून दुधाचे भाव कोसळले आहेत. त्यामुळे शतकऱ्याचे आर्थिक बजेट पूर्णतः कोलमडलेले आहे. तसेच दुधाला अनुदान देण्याची घोषणा ही केवळ कागदावरच राहिली असल्याने शेतकऱ्यांत असंतोष आहे. आता याचे रूपांतरण आंदोलनात झाले आहे. अहमदनगर जिल्ह्यात ठिकठिकाणी दुधाचा प्रश्न पेटला असून रखरखत्या उन्हात शेतकरी रस्त्यावर उतरले.

राज्य सरकारने दूध दराबाबत शेतकऱ्यांच्या रास्त मागण्यांचा विचार करून योग्य निर्णय न घेतल्यास येत्या विधानसभा निवडणुकीत दूधउत्पादक शेतकरी राज्य सरकारला दणका दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत, असा इशारा शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अॅड. अजित काळे यांनी दिला.

मागील १५ दिवसांपासून शेतकरी संघटनेने तालुक्यात जनजागृती करून हरेगाव फाटा येथे रास्ता रोकोची हाक दिली होती. काल मंगळवारी (दि.२५) हरेगाव फाटा येथे भरदुपारी रखरखत्या उन्हात शेकडो शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलनात सहभाग नोंदविला. या दूध उत्पादकांच्या आंदोलनाचे नेतृत्व शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अॅड. काळे यांनी केले. त्यावेळी ते बोलत होते.

या आंदोलनामुळे नेवासे-श्रीरामपूर राज्यमार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. रखरखत्या उन्हात शेकडो दूधउत्पादक या आंदोलनात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. याप्रसंगी जिल्हा दुग्ध विकास अधिकारी गिरीश सोनवणे यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्याचे निवेदन स्वीकारले.

तसेच सर्व मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन दिल्यानंतर दुपारी २ वाजेच्या सुमारास आंदोलन स्थगित करण्यात आले.

नेवासेमध्येही वातावरण तापले
नेवासा तालुक्यातील प्रवरा संगम येथे छत्रपती संभाजीनगर – अहमदनगर महामार्गावर काल मंगळवारी (दि. २५) दूध ओतून शेतकऱ्यांनी आंदोलन केले. यावेळी पंजाब, हरियाणा, येथे दूधाला प्रति लिटर ४० रुपये भाव दिला जातो. तथापि महाराष्ट्रात मात्र सध्या दूधाला प्रति लिटर २७ रुपये दर दिला जात आहे.

त्यासाठी सरकारने दूध मूल्य आयोगाची स्थापना करावी, अशी मागणी आंदोलनात डॉ. अशोक ढगे यांनी केली. या आंदोलनामुळे प्रवरा संगम परिसर शेतकऱ्यांच्या घोषणांनी दुमदूमला होता. जय जवान जय किसान, शेतकरी संघटनेचा विजय असो, दूधाला भाव मिळालाच पाहिजे, अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला.

आज महाराष्ट्रामध्ये दूध उत्पादक शेतकरी संकटात आहे. त्यासाठी दूग्ध मूल्य आयोगाचे संघटन करून त्यामध्ये शेतकऱ्याचे प्रतिनिधी, दूग्ध शास्त्रज्ञ, महाराष्ट्र शासनाचे सचिव, यांचा समावेश करावा. आज एक लिटर दूध उत्पादन करण्यासाठी ३० ते ३२ रुपये खर्च येतो. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही मिळत नाही.

दूध व्यवसाय तोट्यात गेल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. त्यासाठी दूध भेसळ करणाऱ्यांवर कठोर कार्यवाही होणे गरजेचे आहे. दरम्यान, शहरात मात्र दूध चढ्या दराने विकले जाते. तेव्हा हा मलिदा कोण खातो, याचेही संशोधन व्हावे. पाच रुपये प्रति लिटर थकलेले अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर तात्काळ जमा करावे, अशी मागणी यावेळी दूध उत्पादक शेतकरी व चेअरमन बापूसाहेब डावखर यांनी केली.

 

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe