Ahmednagar News : कांद्याच्या घसरलेल्या दरामुळे शेतकरी हवादील होता. आता पावसाचे आगमन झाल्याने खरिपाच्या आशा पल्लवीत असतानाच, कांद्याच्या दरात झालेली सुधारणा दिलासादायक आहे. फेब्रुवारीनंतर तब्बल चार महिन्यांनी एक नंबर कांद्याला तीन हजारांवर भाव मिळाला आहे.
जिल्ह्यातील घोडेगाव बाजार समितीत ३ हजार ३०० तर राहुरी बाजार समितीत ३ हजार १०० रूपये प्रतिक्विंटल दराने कांदा विकला गेला. मागील आठवड्यापासून कांद्याच्या दरात प्रतिक्विंटल तब्बल एक हजार रूपयांची वाढ पहायला मिळाली आहे. अपवादात्मक स्थितीत काही गोणी कांद्याला साडेतीन हजारांपर्यंतचाही भाव मिळाला आहे.
दोन आठवड्यापूर्वी कांदा १७०० ते १८०० रूपये प्रतिक्विंटल दराने विकला जात होता. राहुरी बाजार समितीत रविवारी २९ हजार ६४६ गोणी गावरान कांद्याची आक्क झाली. त्यात एक नंबर कांदा २५०० ते ३ हजार १०० दराने विकला गेला. अपवादात्मक स्थितीत ४४ गोणी कांदा ३ हजार ३०० ते ११ गोणी कांद्याला ३ हजार ५०० रूपयांचा भाव मिळाला.
वांबोरी उपबाजार आवारात शनिवारी (८ जून) २ हजार १०० ते ३ हजार २०० रपये दराने कांदा विकला गेला. घोडेगाव बाजारात ३ हजार ३०० रूपयांपर्यंतचा भाव मिळाला. नगर बाजार समितीत शनिवारी २ हजार ७०० ते २ हजार ९०० दराने कांद्याचा लिलाव झाला आहे. तिसगाव (ता. पाथर्डी) येथील उपबाजार समिती आवारात रविवारी झालेल्या लिलाव प्रक्रियेत एक नंबर कांद्याला ३ हजार १०० रुपये दर मिळाला.
दोन नंबर कांदा दोन ते अडीच हजार, तर तीन नंबर कांद्याला दीड ते दोन हजाराचे दर मिळाले. सरासरी ८३९ कांदा गोण्यांची आवक समितीच्या आवरात झाली होती, अशी माहिती सभापती सुभाष बर्डे यांनी दिली. पावसाला आरंभ झाला असला तरी उपबाजार समिती आवारात कडवळ, मका, ऊस जनावरांच्या चाऱ्यासाठी विक्रीसाठी येत आहे.
चारा विक्री वाहनांसह कांद्याची आवक जावक करणाऱ्या वाहनांच्या सुरक्षिततेसाठी संचालक मंडळाने कुंपण करून लोखंडी दरवाजे बसविले आहेत. सुरक्षा कर्मचारी व काटा नियंत्रक कर्मचारी २४ तास सेवेला उपलब्ध असतात. लिलाव प्रक्रिया बाजार समिती, संचालक कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत केली जाते. जेणेकरून घोडेगाव, अहमदनगर, कडा, शेवगाव बाजार समिती लिलावाचे तुलनेत कांदा उत्पादकांना दर मिळावेत, असा प्रयत्न सुरू आहे, असेही बर्डे यांनी सांगितले.