Ahmednagar News : शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार राबवत असलेल्या ‘त्या’ योजनेचा खेळखंडोबा; अनेक शेतकरी योजनेबाबत अनभिज्ञ

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : शेतकऱ्यांचा विकास व्हावा यासाठी केंद्र व राज्य सरकार विविध योजना राबवत असते. वीज आणि पाणी हे शेतीसाठी महत्वाचे घटक आहेत. मात्र खंडित वीजपुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यावर मत करण्यासाठी राज्य सरकारची शेतकऱ्यांसाठी एक शेतकरी, एक डीपी ही योजना राबवली. मात्र या योजनेला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे हि योजना कागदावरच राहिली.

देशातील शेतकरी सुजलाम् सुफलाम् व्हावा, शेती व शेतकऱ्यांचा विकास व्हावा, या दृष्टिकोनातून राज्य व केंद्र सरकारकडून अनेक महत्वाच्या योजना राबविल्या जातात. या योजनांच्या माध्यमातून शेतीविषयक कामे करताना शेतकऱ्यांना सुलभता यावी तसेच आर्थिक मदत व्हावी, हा त्यामागचा उद्देश समोर ठेवून अशा अनेक योजनांची आखणी केली जाते.

यातील बऱ्याचशा योजना अनुदान स्वरूपातील असल्याने याचा शेतकऱ्यांना फायदा होतो. अगदी त्याच पद्धतीने राज्य सरकारची शेतकऱ्यांसाठी एक शेतकरी, एक डीपी ही योजना फायदेशीर ठरत असली तरीदेखील या योजनेचा प्रचार व प्रसार पाहिजे तेवढ्या प्रमाणात झाला नसल्याने शेतकऱ्यांना या योजनेविषयी फारशी माहिती नाही. त्यामुळे ही योजना कागदावरच असल्याचा प्रत्यय येत आहे.
या योजनेद्वारे शेतकऱ्याला त्यांच्या शेतात एक स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर उभा करून दिला जातो. जेणे करून शेतकऱ्यांना नियमित अखंडित वीजपुरवठा चालू राहिल व पिकाला वेळीच पाणी देता येईल. हा त्या पाठीमागचा उद्देश आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर घेण्यासाठी स्वतःचा हिस्सा भरणे गरजेचे आहे.

जर शेतकरी सर्वसामान्य प्रवर्गातील असेल तर ७ हजार रुपये प्रति एचपी तसेच शेतकरी एसटी प्रवगतील असेल तर ५ हजार रुपये प्रति एचपी इतकी रक्कम भरावी लागेल, ही रक्कम भरल्यानंतर स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर घेण्यासाठी उर्वरित रक्कम राज्य सरकारकडून अनुदान स्वरूपात दिली जाते.

याव्यतिरिक्त शेतात ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी जो अतिरिक्त खर्च येतो, तो राज्य शासनाकडून अनुदान स्वरूपात संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांना मंजूर केला जातो. अशा शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्वाच्या योजना असताना महावितरण कर्मचाऱ्यांच्या उदासीनतेमुळे एक शेतकरी, एक डीपी या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी होताना दिसत नाही.

केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरतील, अशा अनेक योजना वर्षाकाठी कार्यान्वित केल्या जातात. परंतु या योजनांची अंमलबजावणी होण्यासाठी सरकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांची अनास्था कारणीभूत ठरत असल्याने अनेक महत्वाच्या योजना आजही कार्यालयाच्या लालफितीत अडकल्या आहेत, हे ग्रामीण भागातील वास्तव नाकारता येणार नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe