Ahmednagar News : जिल्ह्यातील दक्षिण भागात बहुतांश ठिकाणी पाऊस चांगला झाला. श्रीगोंदा तालुक्यात २४ जून अखेर २५२ मिलीमीटर पाऊस झाला आणि दहा गावांना वरदान ठरणारे परतीच्या पावसावर भरणारे देव, सरस्वती आणि अंबिल ओढ्यावरील ४५ बंधारे जून महिन्यात ओसंडून वाहू लागले.
पाणी आल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलस मिळाला आहे. बंधारे भरल्याने श्रीगोंदा शहर, तांदळी, घुगल वडगाव, देऊळगाव, पारगाव सुद्रिक, चोराचीवाडी, भिंगाण, पेडगाव, अधोरेवाडी, घोडेगाव, आढळगाव या गावांना मोठा फायदा होणार आहे. देव, सरस्वती नदी व आंबील ओढा बहुदा परतीच्या पावसावर तीन-चार महिने वाहतो.

घोडेगाव, औटीवाडी, लेंडी नाला, कापसे मळा हे चार तलाव होते. हे तलाव भरले की उर्वरित पावसाचे पाणी थेट भीमा नदीला जात होते. त्या परिसरातील शेतकऱ्यांना काहीच फायदा होत नव्हता. मात्र परिसरातील शेतकऱ्यांच्या भावनांचा विचार करून लोकप्रतिनिधींनी सरस्वती,
देव नदी व आंबील ओढ्यावर बंधारे निर्मितीसाठी आपापल्या पद्धतीने योगदान दिले. गेल्या १५ वर्षांत परिसरात ४५ लहान-मोठ्या बंधाऱ्यांचे जाळे विणले गेले आहे. आता हे ४५ बंधारे जून महिन्यात ओसंडून वाहू लागले.
पारंपरिक अवजारांच्या माध्यमातून शेती
ग्रामीण भागात अजूनही पारंपरिक अवजारांच्या माध्यमातून शेती केली जाते. नांगर, कुळव, पाटे, चारफणी, सहाफणी आदी अवजारांचा यात वापर होतो. एकदा पेरणी झाली की, शेतकरी अवजारे व्यवस्थित सुरक्षित जागी बांधून ठेवतात. पुन्हा पुढच्या पेरणीला अवजारे बाहेर काढली जातात. वर्षभर एका ठिकाणी असल्यामुळे काही अवजारांची मोडतोड होते. अशा अवजारांच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे.
नक्षत्राचे वाहन सांगतो पाऊस !
नक्षत्राचे वाहन काय आहे, यावरून पावसाचा अंदाज वर्तविला जातो. नक्षत्राचे वाहन बेडूक, म्हैस किंवा हत्ती असेल तर भरपूर प्रमाणात पाऊस, वाहन उंदिर, गाढव, मोर असेल तर मध्यम अन् वाहन कोल्हा किंवा मेंढा असल्यास कमी पाऊस पडेल, असा अंदाज काही शेतकरी लावतात. वाहन घोडा असेल तर केवळ पर्वतीय भागात पाऊस पडण्याचे संकेत समजले जात असल्याचे जाणकार शेतकऱ्यांनी सांगितले.