Ahmednagar News : दररोजच्या जेवणात लसूण हा गरजेचा आहे. लसणाच्या फोडणीशिवाय भाजी खाणे अशक्य. परंतु आगामी काळात लसणाची फोडणी महागण्याची शक्यता आहे. मागील वर्षी प्रतिकूल हवामान आणि अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला होता. त्यामुळे दिवाळीनंतर लसणाचा भाव २००-२५० किलोच्याआसपास होता.
मात्र डिसेंबर महिन्यात हाच भाव थेट ३५०-४०० रुपये किलो झाला होता. त्यानंतर जानेवारी महिन्यात नवीन लसणाची आवक झाल्याने या किमती कमी झाल्या होत्या. मात्र आता पावसाळ्याच्या तोंडावर पुन्हा एकदा किमतीत वाढ झाली आहे. अहमदनगर बाजार समितीत लसणाला ८० ते १८० रुपये किलो असा दर मिळाला.

शेतकऱ्यांना गेल्या वर्षी निसर्गाच्या लहरीपणाचा चांगलाच फटका बसला होता. सतत अवकाळी पाऊस आणि बदलत्या हवामानामुळे शेतमालाचे उत्पादन खूप घटले होते. यात प्रामुख्याने भाजीपाला महाग झाला होता. विशेष लसणाने मोठी झेप घेतली होती. टोमॅटो, कांदा आणि बटाट्याचे भाव देखील वर्षभर टिकून होते. मागील ऑगस्ट महिन्यामध्ये तर दरवाढीचा भडका उडाला होता. त्यानंतर लसणाने मोठी घौडदौड केल्याने ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळवले होते.
आता परत एकदा ऐन पावसाळ्यात लसणाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. राज्यातील विविध बाजार समितींमध्ये लसणाला ८०- ८५ ते १८०-२१० रुपये किलो असा भाव मिळत आहे. गेल्या वर्षअखेरीस लसूणच्या दरवाढीचा विक्रम झाला होता. यावर्षीही हंगामाच्या सुरुवातीपासूनच दरवाढ होण्यास सुरुवात झाली आहे.
गतवर्षी जूनच्या सुरुवातीला राज्यातील विविध बाजार समित्यात लसूण ४० ते ६५ रुपये किलो दराने विकला जात होता. यावर्षी हेच दर ८५ ते २१० रुपयांवर पोहचले आहेत. किरकोळ बाजारात तर २५० ते २८० रुपये किलो या दराने लसणाची विक्री होत आहे. प्रत्येक वर्षी जानेवारीमध्ये लसणाचा हंगाम सुरू होतो.
जूनपर्यंत लसणाचे दर घसरत असतात, परंतु यावर्षी हंगामाच्या सुरुवातीपासूनच लसूण तेजीत आहे. मुंबई बाजार समितीमध्येही गतवर्षीच्या जून महिन्यापेक्षा लसणाचे बाजारभाव दुप्पट झाले आहेत. अहमदनगर बाजार समितीत लसणाला ८० ते १८० रुपये किलो असा दर मिळाला .
लसणाचे उत्पादन कमी झाले असल्यामुळे हा फरक पडला आहे. दिवाळीदरम्यान लसणाची अवाक वाढल्यास काही प्रमाणात दर कमी होतील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्यातच आता इतर भाजीपाला महागल्यास ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री लागू शकते.
केंद्र सरकारला याविषयी लवकर पाऊले टाकावी लागणार आहेत. देशात महागाईचा आलेख चढाच राहिला आहे. केंद्र सरकारने वेळोवेळी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, पण हवामानाने या प्रयत्नांवर पाणी फेरले आहे.