नगर जिल्ह्यातील ‘या’ ठिकाणी संतप्त शेतकऱ्यांनी शासकीय कार्यालयासमोर ओतले दूध अन शेणाचे ट्रॅक्टर ..!

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : दुधाला प्रतिलिटर चाळीस रुपये भाव मिळावा, पशुखाद्याचे दर नियंत्रणात आणावे, यासह इतरही काही प्रमुख मागण्यांसाठी अकोले तालुक्यातील कोतूळ येथे दूध उत्पादक शेतकऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे.

या आंदोलनाचा एक भाग म्हणून मंगळवारी अकोले तालुक्यातील शेतकरी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली कोतुळ ते संगमनेर असा ट्रॅक्टर मोर्चा काढला.

हा मोर्चा संगमनेर शहरात आल्यानंतर पोलिसांनी मोर्चाची दिशा बदलवली. आंदोलनकर्त्यांनी शासकीय विश्रामगृहासमोर थांबत या ठिकाणी दूध व शेण ओतून राज्य सरकारचा निषेध केला. दुधाला योग्य भाव मिळाला नाही, तर लोणी व मुंबई येथे मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी दिला.

दुधाला ४० रुपये भाव मिळावा यासाठी गेल्या १८ दिवसांपासून अकोले तालुक्यातील कोतूळ येथे दूध उत्पादकांचे आंदोलन सुरू आहे. शासनाने या आंदोलनाची दखल न घेतल्याने संतप्त शेतकऱ्यांनी संगमनेरात ट्रॅक्टर मोर्चा आणला. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास अकोले तालुक्यातील कोतुळ येथून या मोर्चास प्रारंभ झाला.

दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास हा मोर्चा संगमनेर शहरात पोहोचला. अकोले बायपासने हा मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयावर काढण्यात येणार होता; मात्र पोलिसांनी वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी पोलिसांनी हा मोर्चा संगमनेर बसस्थानकापासून शासकीय विश्रामगृहाकडे वळविला. या मोर्चामध्ये १०० हुन अधिक ट्रॅक्टर सहभागी झाले होते.

सर्व ट्रॅक्टर शासकीय विश्रामगृहाच्या बाहेर नाशिक- पुणे महामार्गावर थांबविण्यात आले. या ठिकाणी संतप्त दूध उत्पादकांनी प्रचंड घोषणाबाजी केली. या ठिकाणी जमलेल्या शेतकऱ्यांनी शासकीय विश्रामगृहाबाहेर दूध ओतून दिले.

यानंतर काही शेतकऱ्यांनी शासकीय विश्रामगृहाच्या प्रवेशद्वारावर ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये आणलेले शेण ओतले. सद्य स्थितीत दूध उत्पादकांना फक्त गायीच्या शेणाचा फायदा होतो. “हे शेणही आम्हाला नको,” असे म्हणत दूध उत्पादकांनी या ठिकाणी शेण ओतले.

आंदोलनाचे प्रमुख डॉ. अजित नवले म्हणाले, दूध उत्पादकांना ४० रुपये घेतल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही. यानंतर शेतकऱ्यांचा मोर्चा दुग्धविकास मंत्र्यांच्या गावी लोणी येथे काढण्यात येईल.

या ठिकाणीही मार्ग निघाला नाही, तर मंत्रालयावर मोर्चा काढू, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. दोन दिवसांत याबाबत शेतकऱ्यांची बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे ते म्हणाले.

सकाळी १० वाजता कोतुळ येथून मोर्चाला सुरवात करण्यात आली. या रॅलीला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ही रॅली अकोले शहरात आली असता पोलीस प्रशासनाने रॅली अडवण्याचा प्रयत्न केला; मात्र संगमनेरला जायचेच यावर आंदोलन ठाम राहिल्याने अखेरीस पोलीस प्रशासनानेही आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन रॅलीला जाऊ दिले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe