११ मार्च २०२५ श्रीरामपूर : विवाह खर्चामुळे अनेक कुटुंबांची आर्थिक स्थिती कोलमडून जाते.पैशांअभावी अनेक गरीब कुटुंबांसाठी हा आनंदाचा सोहळा अडचणीचा ठरतो.त्यामुळे सरकारची शुभमंगल विवाह योजना लाभदायी ठरत आहे. गरीब कुटुंबांना विवाहाच्या खर्चात बचत करण्याची संधी त्यातून मिळत आहे.
सामूहिक शुभमंगल योजना २००७ मध्ये सुरू करण्यात आली. त्यात वेळोवेळी अनुदानात वाढ करण्यात आली. राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाने सुरू केलेली ही एक महत्त्वाची योजना आहे. गरीब कुटुंबांवरील विवाहाचा आर्थिक दबाव कमी करण्याचा त्यामागे हेतू आहे. एकाच वेळी अनेक जोडपी त्यातून विवाह बंधनात अडकतात. परिस्थिती नसल्याने विवाह करू न शकणाऱ्या वधू-वराच्या पालकांना त्यातून आधार मिळतो.

योजनेचे फायदे
विवाहाच्या खर्चात बचत होते. सरकार आणि सामाजिक संस्थांच्या मदतीने विवाह पार पडतात. योजनेत सहभागी झालेल्या वधू व वरांना २० हजार रुपयांचे अनुदान मिळते. त्यातून त्यांना संसारोपयोगी साहित्य खरेदी करता येते.सामूहिक विवाह समारंभांमुळे खर्चात बचत होते. तसेच, संस्थेकडून विवाह आयोजित केल्यामुळे नातेवाइकांवर ताण पडत नाही. विवाहामुळे गरीब कुटुंबे कर्जबाजारी होतात. त्यांना योजनेचा आधार मिळाला आहे.
नोंदणीकृत संस्थेला मदत
सामूहिक शुभमंगल विवाह योजनेचे आयोजन करणाऱ्या संस्थेला ५ हजार रुपये अनुदान दिले जाते. त्यामुळे संस्थांना प्रोत्साहन मिळते.
जिल्ह्यात इतक्या जोडप्यांना मिळाला लाभ
अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये २०२२-२३ या वर्षामध्ये २३ जोडप्यांना योजनेचा लाभ देण्यात आला.त्यांच्यासह संस्थांना ५ लाख ५२ हजार रुपये अनुदान देण्यात आल्याची माहिती समाज कल्याण विभागाने दिली.
योजनेच्या अटी
मुलाचे किमान वय हे २१ वर्षे, तर मुलीचे किमान वय १८ वर्षे पूर्ण असावे.योजनेचा लाभ हा केवळ वधू व वराच्या पहिल्या विवाहासाठी दिला जातो.जोडप्यांकडे आधारकार्ड, जातीचा दाखला, तसेच पालकांची संमती आवश्यक आहे.