Ahmednagar News : अर्बन बँकतील गैरव्यवहार झाकण्यासाठी बँकेचा जाणिवपूर्वक बळी देण्यात आला असल्याचा गंभीर आरोप बचाव कृती समितीच्या सदस्यांनी केला आहे. बँकेला पुनरुज्जित करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कृती समितीचे राजेंद्र गांधी, राजेंद्र चोपडा, अॅड. अच्युत पिंगळे, मनोज गुंदेचा, अॅड. सागर इंगळे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत अर्बन बँकेबाबत सडेतोड भूमिका मांडली.
याबाबत अधिकृत प्रसिद्धपत्रक त्यांनी जाहीर केले. २०२१ च्या दरम्यान रिझर्व्ह बँकेने अर्बन बँकेच्या व्यवहारातील त्रुटी लक्षात आणून दिल्या होत्या. मात्र प्रत्यक्ष कारवाई करण्यात आली नाही.
संचालक मंडळाच्या कारभारावर ताशेरे ओढण्यात आले होते. म्हणूनच तर ठेवीदारांच्या सर्व ठेवी सुरक्षित मिळाव्यात, अशी बचाव कृती समितीची भूमिका होती. २०० कोटींचे घोटाळे पचविण्यासाठीच अर्बन बँकेचा नियोजनपूर्व खून करण्यात आल्याचा थेट आरोप करण्यात आला.
सहकार विभागाचे नियंत्रण नको म्हणून बँकेला मल्टिस्टेटचा दर्जा दिला गेला, आरबीआयने बरखास्त केलेले संचालक मंडळ पुन्हा सत्तेत आले, आर्थिक निर्बंध लावूनही संचालकांच्या कारभारात सुधारणा झाली नाही,
थकबाकी वसूलीकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. म्हणूनच बँकेचा एनपीए ९७ टक्क्यांवर गेल्याने बँक बंद झाली. बँकेमध्ये ४५६ खाती संशयास्पद आहेत. एकूण १६०० कर्जदारांकडे ४७१ कोटी रुपये अडकले आहेत.
आरबीआयने याकडे वारंवार सूचना देवूनही दुर्लक्ष केल्याचा आरोप अर्बन बँक बचाव कृती समितीने केला आहे. वारंवार संधी देवूनही संचालक मंडळाने कारभारात सुधारणा न केल्याने आरबीआय, सभासद व ठेवीदारांचा आता संचालकांवर विश्वास राहिलेला नाही, असा आरोप राजेंद्र गांधी यांनी केला.
बँक बुडविणाऱ्या दोषी संचालकांवरील कारवाईसाठी अखेरपर्यंत लढा देणार असल्याचे त्यांनी नमूद केले. आरबीआयने बँकेवर अवसायकाची नियुक्ती करण्यास सांगितले आहे. अवसायिकाला स्थानिक पातळीवरील माहिती नसल्याने त्यांच्या माहितीसाठी अभ्यास प्रशासक मंडळ नियुक्त करावे, यासाठी केंद्रीय मंत्रालयाकडे पाठपुरावा करु, असे राजेंद्र चोपडा यांनी सांगितले.