संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचा विकास आराखडा ;आजवर केवळ घोषणाच..! प्रत्यक्षात काम कधी सुरू होणार?

Pragati
Published:

Ahmednagar news : अर्थसंकल्पात राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी नेवासा येथे संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचा विकास आराखडा तयार नवीन करणार असल्याचे सूतोवाच केले.

पण नवीन आराखडा म्हणजे काय आणि तो कधी पूर्ण होणार. प्रत्यक्षात निधी कधी मंजूर होईल. त्याला प्रशासकीय मान्यता मिळेल. व कामाला सुरुवात कधी होईल?

आराखडा पूर्णत्वास येईपर्यंत तीन ते चार वर्षे किंवा त्याहीपेक्षा जास्त वेळ लागण्याची शक्यता वारकऱ्यांना वाटत आहे. कारण यापूर्वी देखील अशा घोषणा झाल्या आहेत. त्यांचे काय झाले असा सवाल उपस्थित केला जात आहे.

२०१२ला माजी मंत्री शंकरराव गडाख आमदार असताना १२ कोटींची कामे झाली, त्यानंतर सर्वच पक्षांच्या नेत्यांकडून फक्त घोषणा केल्या जात आहे.
ज्ञानेश्वर मंदिर विकास आराखडा तयार करणार, अशी अर्थमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनंतर पूर्वीच्या विकास आराखड्याचे काय झाले, की तो आराखडा पूर्ण झालाच नाही, अशी चर्चा नेवासा तालुक्यासह राज्यातील ज्ञानेश्वर भक्त वारकऱ्यांमध्ये रंगली आहे.

आमदार गडाख यांनी २०२१ साली १२ कोटीची कामे देहू, आळंदी विकास निधीमधून मंजूर करून आणली होती. त्यात नेवासा फाटा ते नेवासा मंदिर डांबरीकरण आणि ज्ञानेश्वर मंदिरामागे उद्यान या दोन कामांना मूर्त स्वरूप आले होते. ज्ञानेश्वर मंदिर उद्यान हे नेवाशाचे धार्मिक प्रतिक म्हणून सर्व ठिकाणी वापरले जात आहे. त्या निधीमधून अनेक कामे राहिलेली आहेत.

या घोषणेनंतर पर्यटन खात्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र येणार, त्यानंतर ते कन्सल्टंटची नेमणूक करणार, जागेची पाहणी, कुठले कामे करता येणार अशा विविध बाबींचा सर्व्हे करून तो अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात सादर होणार, त्यानुसार बांधकाम विभागामार्फत त्याचा प्लॅन तयार करून पुढील कारवाई होईल व इस्टिमेट तयार केले जाईल व नंतर जिल्हा नियोजन समितीकडे पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याकडे मजुरीसाठी पाठविले जाईल.

तेथे मंजूरी मिळाल्यावर राज्याचे मुख्य सचिव यांच्याकडे हा प्रस्ताव जाईल, तेथे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीकडून मंजूर झाल्यावर यासाठी निधीची तरतूद होईल.

विकास आराखड्यात समावेश झाला, ही आनंदाची गोष्ट असली तरी यापूर्वीही अशा घोषणा झाल्या आहेत; परंतु प्रत्यक्षात निधी मंजूर होऊन ज्या वेळेस कामाला सुरुवात होईल, त्याच वेळी उपयोग होईल.

यासाठी आमदार गडाख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांना पत्र दिले होते. तालुक्यातील अनेकांनी पालकमंत्री विखे यांच्याकडे मागणी केली होती.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe