शेतकऱ्यांना विहिरीसाठी मिळणार 4 लाखांचे अनुदान ! अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात 855 विहिरीचे उद्दिष्ट

Published on -

Vihir Anudan Yojana : भारत हा शेतीप्रधान देश आहे. आपल्या राज्यालाही शेतीप्रधान राज्याचा दर्जा आहे. कारण की पुरोगामी महाराष्ट्रातील निम्म्याहून अधिक जनसंख्याही उदरनिर्वाहासाठी आजही शेतीवर अवलंबून आहे. हेच कारण आहे की राज्य आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी वेगवेगळ्या योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीमधून चांगले उत्पादन मिळवता यावे यासाठी विहीर अनुदान योजना देखील राबवली जात आहे.

खरेतर शेतीमधून जर चांगले दर्जेदार आणि विक्रमी उत्पादन मिळवायचे असेल तर शाश्वत पाण्याची सोय उपलब्ध असणे अतिशय आवश्यक बाब आहे. मात्र सर्वच शेतकऱ्यांना शाश्वत पाण्याची सोय उपलब्ध व्हावी यासाठी विहीर खोदता येणे शक्य होत नाही. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने अनेकांना इच्छा असतानाही विहीर खोदता येत नाही. त्यामुळे शासनाकडून शेतकऱ्यांना विहिरीसाठी अनुदान पुरवले जात आहे.

राज्यात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरीची कामे पूर्ण केली जात आहेत. दरम्यान याच योजनेसंदर्भात अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्याबाबत एक अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेर तालुक्यासाठी 855 विहिरींचे उद्दिष्ट मिळाले आहे.

भूजल सर्वेक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार तालुक्यातील 57 गावांची वैयक्तिक विहिरीसाठी निवड झाली आहे तर 117 गावांची संयुक्त विहिरीसाठी निवड झाली आहे. दरम्यान या विहिरीसाठी प्रत्येकी चार लाख रुपयांचे अनुदान शासनाच्या माध्यमातून पुरवले जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या योजनेसाठी आतापर्यंत तालुक्यातून 210 अर्ज प्राप्त झाले आहे. खरे तर प्रत्येक शेतकरी कुटुंब लखपती करण्याचा मानसशासनाचा आहे.

मात्र शेतकरी कुटुंब लखपती बनवायचे असेल तर त्यांच्याकडे पाण्याची शाश्वत उपलब्धता असणे आवश्यक आहे. यासाठी शेतकऱ्यांकडे विहिरी असणे गरजेचे आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांना लखपती बनवता येणे अशक्य असल्याने सर्व कोरडवाहू शेतकरी देखील आता बागायती शेतकरी बनले पाहिजेत या दृष्टिकोनातून राज्यात आता विहिरीसाठी अनुदान पुरवले जात आहे.

विहिरीतून उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा तुषार सिंचन, ठिबक सिंचन यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानातून सुयोग्य वापर केला तर दारिद्र्यरेषेखालील असणारे कुटुंब देखील लखपती होईल आणि महाराष्ट्राचा एकात्मिक विकास सुनिश्चित होईल अशी आशा शासनाच्या माध्यमातून व्यक्त होत आहे. दरम्यान आता आपण या योजनेसाठी इच्छुकांना कुठे अर्ज सादर करावे लागतील ? याविषयी ए टू झेड माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

अर्ज कुठं करणार?

विहिरीसाठी इच्छुक लाभार्थ्याने विहित नमुन्यातील अर्ज ग्रामपंचायतीच्या अर्ज पेटीत टाकावेत असे आवाहन करण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करायचा असेल त्यांच्यासाठी देखील सुविधा उपलब्ध आहे.

कोण-कोणती कागदपत्रे लागणार

या योजनेच्या लाभासाठी इच्छुक लाभार्थ्यांना काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. यात सातबारा उतारा, 8अ उतारा, जॉबकार्डची प्रत, सामुदायिक विहीर असल्यास सर्व लाभार्थी मिळून ०.४० हेक्टरपेक्षा अधिक सलग जमीन असल्याचा पंचनामा, सामुदायिक विहीर असल्यास सामोपचाराने पाणी वापराबाबत सर्व लाभार्थ्यांचे करारपत्र आदी कागदपत्रे इच्छुक लाभार्थ्याला सादर करणे आवश्यक आहे.

कोणाला मिळणार लाभ

मिळालेल्या माहितीनुसार या योजनेचा लाभ राज्यातील शेतकऱ्यांनाच मिळणार आहे. राज्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, निरधिसूचित जमाती (विमुक्त जाती), दारिद्रय रेषेखालील लाभार्थी, स्त्री-कर्ता असलेली कुटुंबे, शारीरिकदृष्ट्या विकलांग व्यक्त्ती कर्ता असलेली कुटुंबे, जमीन सुधारणांचे लाभार्थी, इंदिरा आवास योजनेतील लाभार्थी, अनुसूचित जमाती व अन्य परंपरागत वन निवासी, सीमांत शेतकरी (२.५ एकरपर्यंत भूधारणा), अल्पभूधारक (५ एकरपर्यंत भूधारणा) शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या प्रवर्गातील शेतकऱ्यांना विहिरीसाठी चार लाखांचे अनुदान मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News