८ जानेवारी २०२५ श्रीरामपूर : शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी स्थापन केलेल्या प्रोड्यूसर कंपनीच्या वाहनांवर आरटीओ अधिकाऱ्यांनी ओव्हरलोडच्या नावाखाली सोयाबीनची गाडी पकडून ३५ हजार रुपयांचा दंड केला.ही बातमी कानावर येताच आमदार हेमंत ओगले आणि युवा नेते करण ससाणे यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत आरटीओ कार्यालय गाठून अधिकाऱ्यांना धारेवर घरले.
जी तत्परता शेतकऱ्यांच्या वाहनांवर कारवाई करताना दाखवली, त्याबद्दल उपस्थितांनी गांधीगिरी करीत आरटीओ अधिकाऱ्यांचा सत्कार केला. यावेळी आमदार ओगले म्हणाले की, एकीकडे सर्रासपणे अवैध वाळू,मुरूम वाहतूक सुरू असून, त्याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करतात आणि गोरगरीब शेतकरी व हातावर पोट भरणाऱ्या नागरिकांना त्रास देऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करता, ही गोष्ट मी खपवून घेणार नाही.
तातडीने अवैध पद्धतीने वाळू व मुरमांच्या ओव्हरलोड गाड्यांवर कारवाई करा, जोपर्यंत फार्मर प्रोड्यूसर कंपनीने घेतलेला माल गोदामापर्यंत जात नाही,तोपर्यंत
शेतकऱ्यांना त्याच्या मोबदल्याची प्रक्रिया चालू होत नाही,असे असताना देखील जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना त्रास दिला, तर ते खपवून घेणार नाही.
अवैधरित्या वाळू व मुरूम वाहतुकीच्या माध्यमातून पैसे कमाविणे व त्यातून गुंडगिरी करणे, अशा प्रवृत्तींकडे प्रशासनाने त्वरित लक्ष द्यावे, अशा सूचना आमदार ओगले यांनी दिल्या. यावेळी करण ससाणे म्हणाले की जी तत्परता शेतकरी कंपनीच्या वाहनाला दाखवली, तीच तत्परता आपण विनानंबर असणाऱ्या अवैध धंदे करणाऱ्या ओव्हरलोड वाळूच्या गाड्यांवर दाखवणार का,असा सवाल उपस्थित केला.
जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर म्हणाले की, श्रीरामपूर तालुक्यातील नदीभागातून अनेक ठिकाणाहून ओव्हरलोड वाळूचे डंपर चालतात त्याच्याकडे काना डोळा केला जातो आणि दुसरीकडे शेतकऱ्यांच्याच वाहनावर कारवाई का होते कुठे सरकारी अधिकाऱ्यांचेच याच्यामध्ये साथ-गाठ तर नाही ना अशी भावना सर्वसामान्यांच्या मनात निर्माण होत असल्याचे म्हटले.
यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, मार्केट कमिटीचे संचालक राजेंद्र पाऊलबुद्धे, विलास दाभाडे, माजी नगरसेवक आशिष घनवटे, पंडितमामा बोंबले, अशोक उपाध्ये, कलीम कुरेशी, सोमनाथ गांगड, रियाज पठाण, प्रवीण नवले, संतोष परदेशी, जावेदभाई शेख
संजय गोसावी, रितेश एडके, सुनील साबळे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष रितेश चव्हाणके, दादा माकोने, अमोल शेटे, रवी गायकवाड, सुरेश बनसोडे, अशोक जगधने, सुरेश ठुबे, दीपक वमने वैभव कुरहे, सनी मंडलिक, श्रेयस रोटे, राजेश जोंधळे, रितेश गिरमे, गोपाल भोसले, तीर्थराज नवले, योगेश गायकवाड, सागर दुपाटी आदी उपस्थित होते.