दुधाला पाच रुपये अनुदान, पण लाभ घेण्यासाठी काय करावे लागेल? सर्वानाच लाभ नाही मिळणार? पहा सविस्तर

Published on -

गाईच्या दुधासाठी प्रति लिटर पाच अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. याची घोषणा नुकतीच दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बुधवारी (२० डिसेंबर) विधानसभेत केली आहे.

त्यामुळे आता दूध उत्पादकांना दिलासा मिळणार आहे. पाठीमागेच राज्य सरकारने गायीच्या दुधाला प्रतिलिटर ३४ रुपये दर द्यावा असे आदेश दिले असतानाही बऱ्याच ठिकाणी दूध संघ दर २७ ते २८ रुपयांपर्यंत दर देत होते.

राज्यातही शेतकऱ्यांत असंतोष वाढत चालला होता. अनेक आंदोलनेही झाली होती. दरम्यान अधिवेशनात भाजपचे ज्येष्ठ सदस्य हरिभाऊ बागडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांच्यासह अन्य सदस्यांनी राज्य सरकारने प्रतिलिटर अनुदान जाहीर करावे,

अशी मागणी लक्षवेधी सूचनेद्वारे केलेली होती. त्यानुसार आता मंत्री विखे यांनी ही घोषणा केली आहे. दरम्यान या अनुदानाचा लाभ सर्वानाच मिळणार नाही असे काहींचे मत आहे. याठिकाणी आपण ते जाणून घेऊव्यात.

योजनेचा लाभ कसा मिळेल? त्यासाठी काय करावे लागेल?

सर्वात प्रथम म्हणजे सहकारी दूध संघाने दूध उत्पादक शेतकरी यांना ३.२ फॅट आणि ८.३ एसएनएफ असेल तर प्रति लिटर किमान २९ रुपये दूध दर देणे बंधनकारक राहील. त्यांना ही रक्कम दूध उत्पादक शेतकऱ्याच्या वैयक्तिक बँक खात्यावर ऑनलाईन पध्दतीनेच द्यावी लागणार आहे.

मग त्यानंतर शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या वतीने प्रति लिटर पाच रुपये बँक खात्यावर वर्ग करून अनुदानाचा लाभ दिला जाईल. यासाठी सदर शेतकऱ्यांचे बँक खाते हे त्याच्या आधार कार्डशी आणि पशुधनाच्या आधारकार्डशी लिंक करावे लागेल. या विशेष अनुदानाची योजना दुग्धव्यवसाय विकास आयुक्त यांच्या मार्फत राबविली जाणार असल्याची माहितीही विखे यांनी दिली.

सर्वानाच लाभ मिळणार नाही

शेतकरी नेते अजित नवले यांनी यातील काही तोटे दाखवले आहेत. ते म्हणाले आहे की, सरकारकडून अनुदान फक्त सहकारी दूध संस्थांना दिले जाण्याचा निर्णय घेतला गेला आहे परंतु ७२ टक्के दूध खासगी संस्थांना दिले जात असल्याने या अनुदानाचा लाभ अनेकांना मिळणार नाही.

सरकारने अनुदान सर्वांनाच द्यावे अशी विनंती नवले यांनी केली आहे. त्यामुळे जर तुमचे दूध सहकारी दूध संस्थांना असेल तरच अनुदान मिळेल. खासगी संस्थांना दूध असले तर अनुदान मिळणार नाही असा अर्थ याचा होतो अशी चर्चा आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News