पावसाची समाधानकारक हजेरी : शेतकऱ्यांवर इंधनदरवाढीचे ढग दाटले

Published on -

Ahmednagar news : संपूर्ण महाराष्ट्रासह नगर जिल्ह्यातील अनेक भागांत जून महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाचे दमदार आगमन झाले आहे. त्यामुळे शेतकरी पेरणीपूर्व मशागत करण्यात व्यस्त झालेले आहेत. मात्र इंधन दरवाढीमुळे ट्रॅक्टरद्वारे पेरणी व मशागत करण्याचे दर प्रतिएकरी २०० ते ४०० रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे हे शेतकऱ्यांवर इंधन दरवाढीचे काळे ढग दाटून आलेले आहेत. पेरणीपूर्व ते पेरणीपर्यंतच्या खर्चात झपाट्याने वाढ झाली आहे.

शेतकऱ्यांनी शेतात पेरणीपूर्व मशागतीची कामे उरकत आली आहेत. आता काहि शेतकऱ्यांनी शेतात पेरण्या करण्यास सुरुवात केली आहे; परंतु महागाईने शेतकरी हैरान झाला आहे. संपूर्ण महाराष्ट्रासह नगर जिल्ह्यातील अनेक भागांत जून महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाचे दमदार आगमन झाले असून काही जिल्ह्याच्या बऱ्याच भागांत म्हणावा असा पाऊस पडला नसून पावसाच्या आशेने शेतकऱ्यांमध्ये सध्या उल्हासाचे वातावरण आहे. शेतातील खरीप हंगामाच्या पेरणीस आता सुरुवात झाली आहे.

गतवर्षी संपूर्ण खरीपाचा हंगाम फेल गेल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. शेतकऱ्यांनी यावेळी पुन्हा एका नव्या उमेदीने व उत्साहाने खरिपाची पेरणी करण्यास सुरुवात केली आहे. बियाणे दरवाढीचा सर्वसामान्य शेतकऱ्यांना फटका बसला आहे. यावर्षी खर्चाचा ताळमेळ बसवणे व शेतीचे उत्पादन कसे वाढेल, यासाठी शेतकरी प्रयत्न करत आहेत.

यावर्षी शेतीतून चांगले उत्पादन मिळेल, या आशेवर सर्व शेतकरी आहेत. येत्या दि. १५ जूनपर्यंत चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. पेरणीपूर्व जमिनीत १०० मिलिमीटर ओल असणे गरजेचे आहे. जमिनीत ओलीचे योग्य प्रमाण असल्यास सोयाबीन, मका, बियाण्यांची पेरणी करावी. भुईमूग, कपाशी आदींची लागवड करावी, असे आवाहन कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना करण्यात आले आहे. गतवर्षी सर्वच शेतकऱ्यांची खरिपाची पिके अत्यंत चांगली होती; पण पावसाचा अनेक दिवसाचा खंड पडला.

या परिणामास्तव खरीपाच्या पिकांची अक्षरशः सुकून काडी झाली होती. दुष्काळाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. सोयाबीन, मका पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले होते. पिके उभे करण्यासाठी केलेला खर्चही वसूल झाला नाही. शेतकऱ्यांनी खरिपाच्या पिकांसाठी शेत तयार केले आहे; परंतु सोयाबीनच्या पडलेल्या बाजारभावामुळे यावर्षी सोयाबीन पेरणी करावी की नाही, असाच संभ्रम निर्माण झाला आहे. मका पिकाचे क्षेत्र यावर्षी वाढेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

शेतकरी चालू वर्षी आपल्या जवळ असलेली तुटपुंजी खर्च करून शेतात राबत आहे. खरिपाच्या पेरण्या करण्यासाठी जिवाचे रान करत आहेत. सोयाबीन, मका, कपाशी, भुईमूग आदी खरीपाच्या पिकांचे उत्पादन चांगल्या क्षमतेने वाढेल, यासाठी शेतकरी मेहनत घेत आहेत. निसर्ग यावर्षी चांगली कृपादृष्टी करेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News