अहिल्यानगरमधील या तालुक्यात तीव्र पाणीटंचाई, १३ गावांना टँकरद्वारे केला जातोय पाणीपुरवठा

संगमनेर तालुक्यात पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असून १३ गावांना दररोज १६ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. २३ हजार लोकसंख्येसाठी ४६ खेपा मंजूर असून, काही ठिकाणी खासगी टँकरही कार्यान्वित करण्यात आले आहेत.

Published on -

संगमनेर- तालुक्यात उन्हाच्या तीव्रतेने वाढलेली पाणीटंचाई गंभीर होत असून, १३ गावांना आणि संबंधित वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे. सध्या १० शासकीय टँकरमार्फत दररोज ४५ ते ४६ खेपा घेतल्या जात असून, सुमारे २३ हजार लोकसंख्येला या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे.

१६ टँकरद्वारे पाणीपुरवठा

उन्हाच्या झळांमुळे पाण्याची मागणी वाढत असून, प्रशासनाने टँकरची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता ६ खासगी टँकरदेखील पाणीपुरवठ्यासाठी कार्यरत करण्यात येणार असून, एकूण १६ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे. विशेष म्हणजे, खासगी टँकरवर जीपीएस प्रणाली बसवण्यात आली असून त्यामुळे त्यांच्या हालचालींवर प्रशासन लक्ष ठेवू शकणार आहे.

खासगी टँकरही सुरू

संगमनेर खुर्द, रायतेवाडी आणि कौठे बुद्रुक या तीन ठिकाणी गोड्या पाण्याचे स्त्रोत असून, येथील विहिरींमधून टँकर भरले जात आहेत. शनिवारपासून खासगी टँकरची सेवा सुरू करण्यात आली आहे. याशिवाय चिकणी, औरंगपूर, माळेगाव पठार येथील विहिरी अधिग्रहित करून त्या-त्या गावांमध्ये थेट पाणीपुरवठा करण्याची योजना आहे.

या गावात पाणी टंचाई

सायखिंडी, खरशिंदे, पिंपळगाव देपा, खंडेरायवाडी, पोखरी बाळेश्वर, वरवंडी, चौधरवाडी, दरेवाडी, खांबे, कुंभारवाडी, डोळासणे, कर्जुले पठार, गुंजाळवाडी पठार या गावांना आणि संबंधित वाड्यांना टँकरद्वारे पाणी दिले जात आहे. प्रत्येक गावात विविध वाड्यांमध्ये टंचाई जाणवत असून, तिथेही टँकर सेवा नियमितपणे सुरू आहे.

प्रशासनाकडून उपाययोजना

२०१२ मध्ये झालेल्या दुष्काळाच्या तुलनेत यंदा स्थिती थोडी सावरणारी असली तरीही चिंता वाढवणारी आहे. २०१२ मध्ये एकूण ७३ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता. २०२४ मध्ये ३१ टँकरद्वारे ही गरज भागवली गेली होती. यंदा टंचाईच्या सुरुवातीच्या टप्प्यातच टँकरची वाढ करण्यात आल्याने प्रशासनाने उपाययोजना वेळीच हाती घेतल्याचे दिसते.

सध्या सुरू असलेली ही टँकर योजना नागरिकांना काही अंशी दिलासा देत असली तरी, दीर्घकालीन उपाययोजना आणि जलस्रोतांचे संवर्धन या दृष्टीने ठोस पावले उचलण्याची गरज अधिक तीव्रतेने जाणवते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe