अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील दुर्गम भागात असणारी हनुमाननगर शाळा राज्यभर गाजली. लोकसहभागातून केलेला कायापालट व इतर कारणाने ही शाळा राज्यात आदर्श ठरली.
परंतु आता या शाळेच्याच नशिबी शासन प्रशासनाची उदासीनता आली आहे. या हनुमाननगर आदर्श शाळेत सध्या ६० विद्यार्थ्यांना एकच शिक्षक शिकवायला आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ लागले आहे.

त्यामुळे पालकांनीही या शाळेतील विद्यार्थाचे सामुहीक दाखले मागणीचा अर्ज केला असून या शाळेत एकही विद्यार्थी पाठवायचा नाही असा निर्णय घेतला आहे.
राज्यात बनवला होता नावलैकिक
उसतोड मजुरांची वस्ती असणाऱ्या भारजवाडी येथील हनुमाननगर वस्तीच्या या उजाड माळरानावर या शाळेतील तत्कालीन शिक्षक लहू बोराटे व राघू जपकर यांनी जीवाचे रान करत येथे शिक्षणाप्रती जनजागृती केली.
त्यासाठी विविध उपक्रम राबवले. आपलीही मुले शिक्षण घेऊन मोठी व्हावीत ही भावना पालकांमध्ये त्यांनी रुजवली. परिणामी पालक सहभाग वाढत गेला. त्यातूनच निर्माण झाले राज्याला आदर्श देणारे शिक्षण मंदिर. शिक्षणाप्रती झटणाऱ्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार दिले गेले.
‘असे’ लागले ग्रहण
राज्यात नावलौकिक मिळवलेल्या शाळेस ग्रहण लागण्यास सुरवात झाली. जून महिन्यात येथील शिक्षकाची प्रशासकीय बदली झाल्यानंतर एक शिक्षक व एक शिक्षिकेची नियुक्ती येथे झाली.
मात्र शिक्षिकेची पदोन्नती झाल्याने त्या एका शिक्षकावरच या शाळेची भिस्त राहिली. ६० मुलांसाठी चार वर्गावर शिकवण्यासाठी एका शिक्षकाची तारेवरची कसरत होऊ लागली.
त्याचा परिणाम मुलांच्या गुणवत्तेवर झाला. पालकांनी गट शिक्षण अधिकऱ्यांचे लक्ष वेधले पण म्हणावा असा काही उपयोग झाला नाही. अखेर मुलांच्या दाखल्यांची मागणी पालकांनी केली आहे.
फुलांच्या वर्षावात दिला होता शिक्षकांना निरोप
या शाळेतील शिक्षक लहू बोराटे यांचा खूप लागावं गावाला झाला होता. त्यांची जून महिन्यात बदली झाल्यानंतर सर्वच पालकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते. सर्वच गावाने फुलांचा वर्षाव करत या शिक्षकांना निरोप दिला होता. आता याच शाळेवर, गावावर शिक्षक देण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ आलीये.