पारनेर तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपले! शेतकऱ्यांचे पत्रे उडाले, झाडे पडली आणि फळपिकांचे झाले अतोनात नुकसान

तालुक्यात वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाने आंबा, गहू, कांदा, डाळिंब पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी नुकसानभरपाईसाठी मागणी केली आहे.

Published on -

पारनेर- गुरुवारी सायंकाळी पारनेर तालुक्यात आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने वनकुटे, पठारवाही, वाडेगव्हाण, यादववाडी, मावळेवाडी, तास या गावांना जबरदस्त फटका बसला. पावसाच्या जोरदार सरी आणि वाऱ्याच्या झंझावातामुळे शेतपिके उध्वस्त झाली. कांदा, वाटाणा, गहू, आंबा, डाळींब या मुख्य पिकांचे मोठे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी भाजीपाला व फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत.

आंबा पिकांचे नुकसान

वादळामुळे आंब्याच्या बागांतील कैऱ्या गळून गेल्याने फळबागांचे मोठे नुकसान झाले. वाडेगव्हाण, नारायणगव्हाण, यादववाडी, मावळेवाडी या गावांमध्ये नुकसान अधिक प्रमाणात झाले आहे. आंबा, चिकू, डाळींब, केळी, मका, कलिंगड, झेंडू यासारख्या हंगामी व फळपिकांवर याचा मोठा परिणाम झाला आहे.

या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाले असून, त्यांनी तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.

वादळात नागरिक जखमी

वादळाच्या तडाख्यामुळे अनेक घरांचे पत्रे उडाले आहेत. वनकुटे तास येथील गोपीनाथ नामदेव औटी यांचे घर पडले आहे, तर केरु देवराम साळवे, भाऊसाहेब नामदेव आवटी यांचे छप्पर उडाले. या अपघातात आवटी यांच्यासह त्यांची आई आणि पत्नी किरकोळ जखमी झाल्या. बालू नाना औटी, सुभाष साळवे, सुभाष गुंजाळ, देवीचंद वाघ, परशु मेंगाळ यांच्यासह अनेकांचे घरांचे छप्पर वादळी पावसात उडाले.

प्रशासनाकडून पंचनाम्याला सुरुवात

कृषी व महसूल विभागाकडून सध्या ९ गावांमध्ये संयुक्त पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. तालुका कृषी अधिकारी गजानन घुले यांनी सांगितले की, या नुकसानीचा अहवाल शासन दरबारी सादर करण्यात येणार आहे. मात्र स्थानिक नागरिकांनी महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी किंवा तहसीलदार यांनी अद्याप भेट न दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

राजकीय नेत्यांकडून गावांची पाहणी

भाजपा तालुकाध्यक्ष राहुल शिंदे, सभापती गणेश शेळके, दूध संघाचे अध्यक्ष दत्ता पवार, आणि सरपंच पंकज कारखिले यांनी शुक्रवारी सकाळी नुकसानग्रस्त गावांची पाहणी केली.

राहुल शिंदे यांनी सांगितले की, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार काशिनाथ दाते यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

मंडळनिहाय पावसाची नोंद

मंडळनिहाय दोन दिवसांत झालेल्या पावसाची नोंद अशी आहे – पारनेर १६.५ मिमी, भाळवणी ३.५ मिमी, टाकळी ढोकेश्वर व कान्हुर पठार ३२.३ मिमी, वाडेगव्हाण १३.५ मिमी, सुपा ८ मिमी, निधोज ०.८ मिमी, पळशी ९.१ मिमी, पळवे खुर्द २० मिमी, वडझिरे ४.१ मिमी. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा धुळीस मिळाल्या आहेत.

पिकांचे क्षेत्र आणि बाधित शेतकरी

वनकुटे (२६० शेतकरी – १३७ हेक्टर), तास (४७ शेतकरी – २४.५ हेक्टर), काकणेवाडी (१७५ – १० हेक्टर), नारायण गव्हाण (३१६ – २२० हेक्टर), यादववाडी (१२१ – ११० हेक्टर), मावळेवाडी (२०४ – १२९ हेक्टर), वाडेगव्हाण (३३० – २४० हेक्टर), कुरुंद (६३ – ३१.५ हेक्टर), पाडळी रांजणगाव (३ – १.४ हेक्टर) या गावांमध्ये शेकडो शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

नुकसानभरपाईची मागणी

या संपूर्ण परिस्थितीने शेतकरी आर्थिकदृष्ट्या अधिक अडचणीत सापडला असून शासनाने तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी होत आहे. अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या पिकांचे योग्य मूल्यमापन करून शेतकऱ्यांना सानुग्रह मदत मिळणे अत्यंत गरजेचे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe