..काय तर म्हणे इडा पीडा टळो बळीचे राज्य येवो !! अवकाळीतून कशीबशी वाचवलेली पिके आता हरीण, लांडगा, रानडुकरे अन बिबट्यांच्या कचाट्यात !

Ahmednagar News : अस्मानी सुलतानी संकटे शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलेले आहे. कमी पावसाने खरीप पिके हातची गेली. आता अवकाळी, धुके अन् ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकांवर त्याचा परिणाम झाला. पावसाचे प्रमाण कमी असल्याने

पाण्याची कमतरता भासल्याने गहू, कांद्याचे क्षेत्र कमी झाले. परंतु ज्वारी, चारा पिकांच्या क्षेत्रात वाढ झाली. मागील महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने ज्वारी पिकांना जीवनदान मिळाले. परंतु आता ऐन बहरात आलेल्या ज्वारी तसेच चारा पिकांसाठी रानडुकरे कर्दनकाळ ठरत आहेत.

अहमदनगर जिल्ह्याला मोठी वनसंपदा लाभलेल्या क्षेत्रात वन्यप्राण्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात दिसून येते, हरीण, काळवीट, मोर, लांडगा, खोकड, कोल्हा, साळींदर हे प्राणी गर्भगिरीच्या आहे. टेकड्यांत आढळून येतात.

तालुक्यातील अनेक भागांत बिबट्यांचाही वावर आढळून येत आहे. परंतु, शेतक-यांसाठी डोकेदुखी ठरणाऱ्या रानडुकरांची संख्या सर्वात अधिक आहे. सध्या यांच्या कचाट्यात पिके सापडली आहेत. पिकांची नासाडी होत आहे तर बिबट्याच्या दहशतीने शेतकरी पिकांना पाणी देण्यास शेतात जाण्यास धजावत नाहीये.

रब्बी हंगामात वीस हजार हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झाली आहे. पाण्याचे संकट उभे ठाकण्याची शक्यता असल्याने कांदा, गहू पिके, फळबागांनाही याचा फटका बसण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत ज्वारी हे एकमेव पीक शेतकऱ्यांसाठी तसेच जनावरांच्या चाऱ्यासाठी फायदेशीर आहेत

परंतु रानडुकरांनी उच्छाद मांडला असून मोठ्या प्रमाणात पिकांची नासाडी ते करत आहेत. रानडुकरांचे कळप उभ्या पिकांवर डल्ला मारत असून ज्वारी, मका याबरोबर इतर पिकांचीही नासाडीही करत आहेत. अतिवृष्टी, अवकाळी, गारपीट, ढगाळ हवामान त्यातच चालू वर्षी पाणी टंचाई, कवडीमोल भाव यामुळे त्रस्त असलेल्या शेतक-यांसमोर या वन्यप्राण्यांचे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे आता शेतकरी वर्ग हतबल झाला आहे.

काय उपाय करावेत?

अहमदनगरच्या उपवनसंरक्षक सुवर्णा माने यांनी सांगितले आहे की, सलून दुकानातील केस बांधावर जाळावेत, तसेच पोते ऑइलमध्ये युडवून त्यावर मिरची पूड टाकून जाळल्यास त्याच्या धुरानेही रानडुकरांचा उपद्रव कमी होत असल्याचे दिसून आले आहे. शेतकऱ्यांनी हा प्रयोग करावा असे त्या म्हणाल्या आहेत. यामुळे रानडुकरांचा उपद्रव कमी होईल पण बिबट्या, लांडगे, हरणांचे संकट तर आहेच.