Petrol Car VS Diesel Car:- जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये कार खरेदी करण्याचा विचार येतो तेव्हा सगळ्यात आधी दोन ते तीन गोष्टींचा प्रकर्षाने विचार केला जातो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुमचा जितका बजेट आहे त्या बजेट मधील कारची निवड, दुसरे म्हणजे आपल्या बजेटमध्ये चांगली वैशिष्ट्ये आणि मायलेज उत्तम असणारी कार मिळावी आणि तिसरं म्हणजे कार घेताना ती पेट्रोल घ्यावी की डिझेल कार घ्यावी? या तीन गोष्टींचा विचार प्रामुख्याने केला जातो.
बजेट मधील कार निश्चित केली जाते व त्यासोबत फीचर्स आणि मायलेज देखील उत्तम असे मिळतात. परंतु सगळ्यात मोठा प्रश्न पडतो की आता पेट्रोल कार घ्यावी की डिझेल? कारण या दोन्ही कारमध्ये बराच फरक असतो व दोन्ही कारचे काही फायदे तोटे देखील आहेत. त्यामुळे या लेखात आपण डिझेल कार आणि पेट्रोल कार बद्दलची थोडक्यात माहिती बघू.
कार खरेदी करायची तर कोणती कार ठरेल फायद्याची? पेट्रोल की डिझेल?
1- पेट्रोल आणि डिझेलमध्ये जास्त खर्चिक काय आहे?- जर आपण या दोन्ही कारचा एकूण मेंटेनन्स खर्च बघितला तर यामध्ये फरक आहे. डिझेल कारचे जर इंजिन बघितले तर त्यातील यंत्रणा खूपच गुंतागुंतीची आहे व त्यामुळे बऱ्याचदा जास्त पैसे मोजावे लागतात. डिझेल कारच्या तुलनेमध्ये मात्र पेट्रोल कारचा मेंटेनन्स खर्च खूप कमी असतो.
2- डिझेल कार चांगले मायलेज देते की पेट्रोल कार?- कोणतीही नवीन कार किंवा वाहन खरेदी करताना सगळ्यात अगोदर मायलेज बद्दल विचार केला जातो. कारण या गोष्टीचा सरळ संबंध पैशांशी येत असल्याने मायलेज खूप महत्त्वाचे असते.
पेट्रोल कारच्या तुलनेमध्ये डिझेल इंजिनवर चालणारी कार उत्तम मायलेज देते. पेट्रोल इंजिनच्या तुलनेत डिझेल इंजन कमी ज्वलनशील असल्यामुळे डिझेल वाहनाचे मायलेज पेट्रोल वाहनाच्या तुलनेत सरासरी 20 ते 25 टक्के जास्त असते.
3- पेट्रोल आणि डिझेल कार दोघींचे आयुर्मान– जर पेट्रोल कार असो किंवा डिझेल कार असो दोन्ही कारची जर देखभाल व्यवस्थित पद्धतीने घेतली तर दोघींचे आयुष्य एकसारखे असू शकते.
परंतु डिझेल इंजिनची बांधणी खूप मजबूत असल्याने ते जास्त कालावधी करिता टिकते. परंतु आता जे काही आधुनिक पेट्रोल इंजिन आलेली आहेत ते देखील जास्त टिकाऊ राहावेत या पद्धतीने डिझाईन करण्यात आलेली आहेत.
4- पेट्रोल आणि डिझेल कारपैकी पैशांच्या दृष्टिकोनातून काय परवडते?- डिझेल इंजिन असलेल्या गाड्यांसाठी पेट्रोल इंजिन असलेल्या गाड्यांपेक्षा तुलनेने जास्त पैसे मोजावे लागतात. कधीकधी हजारो किंवा लाखो रुपयांमध्ये हा फरक जातो.
परंतु पेट्रोल इंजिनच्या तुलनेत डिझेल इंजिनची क्षमता जास्त असते व डिझेल इंजिन जास्त टॉर्क जनरेट करते व उत्तम परफॉर्मन्स देते.
त्या तुलनेत मात्र पेट्रोल इंजिन अधिक हॉर्सपॉवर्स देतात व वेगवान एक्सेलरेशन देतात. डिझेल इंजिन असलेल्या कार चांगली इंधन कार्यक्षमता देतात. परंतु पेट्रोल कार आणि डिझेल कार यांचा खर्च व मेंटेनन्स बघितला तर पेट्रोल कारचा खर्च आणि मेंटेनन्स खर्च कमी असतो.