भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा वापर दिवसेंदिवस वाढत असून यामध्ये कार, इलेक्ट्रिक स्कूटर तसेच वेगवेगळ्या इलेक्ट्रिक बाइक्स अनेक नामांकित कंपन्यांकडून लॉन्च करण्यात येत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये आता रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहने आपल्याला धावताना दिसून येतील.
त्यासोबतच आता हा इलेक्ट्रिक वाहनांचा प्रवास भारतीय शेतीपर्यंत देखील पोहोचला असून शेतीसाठी उपयुक्त असलेले ट्रॅक्टर देखील आता इलेक्ट्रिक अवतारामध्ये लॉन्च करण्यात आले असून या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरच्या लोकार्पण सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते.
हे इलेक्ट्रिक ट्रॅक्टर ऑटोनेक्स्ट या कंपनीने लॉन्च केले असून हे देशातील पहिले इलेक्ट्रिक ट्रॅक्टर AutoNxt X45 या नावाने बाजारात आणले गेले आहे.
कसे आहे देशातील पहिले इलेक्ट्रिक ट्रॅक्टर?
AutoNxt X45 या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरचा लुक आणि डिझाईनच्या बाबतीत ते पारंपारिक ट्रॅक्टर सारखेच आहे. हे ट्रॅक्टर प्रामुख्याने भारतातील शेतीशी संबंधित अवघड कामे करण्यास सक्षम असून शेतीच्या कामांच्या संदर्भात शेतकऱ्यांचा होणारा खर्च कमी करण्यामध्ये हे ट्रॅक्टर महत्त्वाची भूमिका पार पाडेल.
या ट्रॅक्टरमध्ये कंपनीच्या माध्यमातून 32KW क्षमतेची इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे व ती कमाल 45 एचपी पावर जनरेट करते. एवढेच नाही तर या इलेक्ट्रिक ट्रॅक्टर मध्ये 35 KWHr क्षमतेचा बॅटरी पॅक देण्यात आला आहे जो एका चार्जवर आठ एकर क्षेत्रात आठ तास काम करू शकतो.
याच्या रेंजवर माहिती देताना कंपनीचे सीईओ कौस्तुभ धोंडे यांनी सांगितले की, जड कामामुळे त्याची रेंज थोडी कमी जास्त असू शकते. परंतु तरीदेखील एका चार्जवर कमीत कमी सहा तास हा आरामात काम करू शकतो. या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरमध्ये कंपनीने दोन वेगवेगळे चार्जिंग पर्याय दिले असून यामध्ये घरगुती सॉकेट(15A) ला जोडून देखील हा ट्रॅक्टर चार्ज करता येऊ शकतो व नियमित (सिंगल फेज) चार्जरने त्याची बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी अंदाजे सात तास लागतील.
तसेच तीन फेज चार्जसह त्याची बॅटरी केवळ तीन तासांमध्ये पूर्णपणे चार्ज होऊ शकते. या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची लोडिंग क्षमता देखील चांगली आहे. या ट्रॅक्टर बद्दल कंपनीचे म्हणणे आहे की, शेतीच्या कामांव्यतिरिक्त हा सिमेंट उत्पादन तसेच बांधकाम उद्योग व संरक्षण तसेच विमानतळ इत्यादी कामांसाठी देखील योग्य आहे.
ट्रॅक्टर पूर्णपणे इलेक्ट्रिक असल्यामुळे डिझेलवर होणारा खर्चात मोठ्या प्रमाणावर बचत होऊ शकते. याचा मेंटेनन्स खर्च देखील खूपच कमी आहे व कोणत्याही डिझेल ट्रॅक्टरच्या तुलनेत याला चालवण्यासाठी लागणारी किंमत म्हणजेच इंधनाचा खर्च देखील खूपच कमी आहे.
चांगल्या परफॉर्मन्ससाठी हा ट्रॅक्टर उच्च टॉर्क आणि तीव्र प्रवेग देतो. तसेच इलेक्ट्रिक असल्यामुळे त्याचा कुठल्याही प्रकारचा आवाज येत नाही व अतिशय शांतपणे हे ट्रॅक्टर चालते. त्यामुळे निवासी भागात देखील याचा वापर सहजरीत्या करता येतो.
बॅटरी किती कालावधीपर्यंत टिकू शकेल?
इलेक्ट्रिक वाहनामध्ये बॅटरी खूप महत्त्वाची असते व या ट्रॅक्टरच्या बॅटरी बद्दल कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर माहिती देण्यात आली आहे व त्या माहितीनुसार बघितले तर या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरच्या बॅटरीची लाईफ सायकल साधारणपणे आठ ते दहा वर्षापर्यंत असून या कालावधीपर्यंत ती सहज टिकू शकते.
परंतु बॅटरीचे लाईफ हा वाहनाचा लोड तसेच वापर व तापमानाची श्रेणी इत्यादीवर अवलंबून असते. हा ट्रॅक्टर आता भारतात विक्रीसाठी उपलब्ध झालेला आहे.
किती असणार या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची किंमत?
या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरच्या किमतीबद्दल कंपनीचे सीईओ कौस्तुभ धोंडे यांनी मीडियाला सांगितले की, या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची सुरुवातीची किंमत 15 लाख रुपये आहे. तसेच यामध्ये इलेक्ट्रिक वाहनांवरील सबसिडीचा समावेश नाही. इलेक्ट्रिक वाहनावरील सबसिडी वेगवेगळ्या राज्यांवर अवलंबून असणार आहे व त्यानुसार त्याची किंमत कमी होऊ शकते.