Cotton Procurement : सीसीआयकडून खुल्या बाजारातून यंदा कापसाची खरेदी सुरू झाली आहे. यामुळे कापूस दराला आधार मिळेल आणि शेतकऱ्यांना चार पैसे अधिक मिळतील अशी आशा होती. जाणकार लोकांनी देखील या गोष्टीला दुजोरा दिला. मात्र सध्याची वस्तूस्थिती काही औरच आहे.
सी सी आय कडून अतिशय कमी दरात कापूस खरेदी होत असल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून होऊ लागली आहे. सीसीआयने खरेदी दर कमी केले असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी नंदुरबार जिल्ह्यात सीसीआयची खरेदी बंद पाडली आहे. जिल्ह्यातील पळाशी या कापूस खरेदी केंद्रावर कापसाला कमी दर मिळाला म्हणून शेतकऱ्यांनी खरेदी बंद पाडत रस्ता रोको केला.

खरं पाहता गेल्यावर्षी कापसाला कधी नव्हे तो उच्चांकी दर मिळाला. परिणामी यंदा कापूस लागवड वाढली. शेतकऱ्यांना गेल्या वर्षी प्रमाणेच कापसाला दर मिळेल आणि चांगले उत्पन्न पदरी पडेल अशी आशा होती. मात्र कापूस पीक वाढीच्या अवस्थेत असतांना झालेली अतिवृष्टी आणि पिक वेचणीच्या अवस्थेत असताना आलेला परतीचा पाऊस यामुळे कापसाच्या उत्पादनात भली मोठी घट झाली.
यामुळे कापसाला गेल्यावर्षीप्रमाणे अधिक दर मिळेल तरच शेतकऱ्यांना चार पैसे पदरी शिल्लक राहतील अशी परिस्थिती निर्माण झाली. गेल्यावर्षी 12 हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. म्हणजे शेतकऱ्यांना यापेक्षा अधिक दराची यंदा अपेक्षा होती. मात्र, गेल्या वर्षी प्रमाणेच दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे. आता शेतकरी निदान 10000 रुपये प्रति क्विंटल असा दर कापसाला मिळेल अशी आशा बाळगून आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा
दरम्यान सीसीआयची खरेदी सुरू झाली यामुळे या आशेला अजून बळ मिळाल. मात्र गेल्या दीड महिन्यापासून जे दर स्थिर होते ते देखील आता कमी होऊ लागले आहेत. काल सीसीआयने नंदुरबार जिल्ह्यातील पळाशी या खरेदी केंद्रावर बाराशे रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा भाव पाडला. यामुळे शेतकरी संतप्त झाले आणि शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला होता.
निश्चितच सीसीआय मुळे कापूस दराला आधार मिळेल अशी शेतकऱ्यांची आशा होती मात्र तूर्तास सीसीआय पण शेतकऱ्यांच्या मुळावर उठलं असल्याचे चित्र आहे. दरम्यान, सीसीआयची खरेदी ही खुल्या बाजारात ज्या पद्धतीने दर मिळतोय त्या पद्धतीने होणार आहे म्हणजेच खुल्या बाजारात कमी दर मिळाला तर सीसीआयची खरेदी कमी दरात होईल आणि खुल्या बाजारात जर दर वाढले तर सीसीआय पण दर वाढवेल असे सांगितले जात आहे.