सोनई- सोनईजवळच्या लोहगावात एक धक्कादायक घटना घडली. एका ४७ वर्षीय महिलेचा तिच्याच कुटुंबीयांनी खून केल्याचा प्रकार सोमवारी (दि. २४) समोर आला. पतीला सोडून ती अहिल्यानगरला राहायला गेल्याचा राग कुटुंबीयांना आला आणि त्यांनी तिची हत्या केली. या प्रकरणी मृत महिलेच्या मुलाच्या तक्रारीवरून सोनई पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आलाय. यातल्या पतीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
मृत महिलेचा मुलगा यश आप्पासाहेब ढेरे (वय १९, रा. ढेरेवस्ती, लोहगाव, सध्या रा. सागर हॉटेलमागे, पाईपलाइन रोड, अहिल्यानगर) याने सोनई पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्याने सांगितलं की, त्याची आई संपदा आप्पासाहेब ढेरे (वय ४७) अहिल्यानगरात पाईपलाइन रोडवर सागर हॉटेलमागे राहायला गेली होती. याचा राग कुटुंबीयांना आला. त्यांनी एकत्र येऊन कट रचला आणि कुऱ्हाडी तसेच लाकडी दांड्याने तिच्या डोक्यावर, शरीरावर मारहाण केली. पोटात लाथाही मारल्या. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली आणि अखेर तिचा मृत्यू झाला.

या फिर्यादीवरून पोलिसांनी आप्पासाहेब भागवत ढेरे, भागवत कुंडलिक ढेरे, संतोष भागवत ढेरे, अर्चना संतोष ढेरे (सर्व रा. ढेरे वस्ती, लोहगाव) आणि दीपक सोनवणे (रा. सोनई) यांच्यावर गुन्हा दाखल केला. यातला पती आप्पासाहेब भागवत ढेरे याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या घटनेचा तपास सहायक पोलिस निरीक्षक आशिष शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सूरज मेढे करत आहेत. ही घटना गावात चर्चेचा विषय बनली असून, पोलिस आता इतर आरोपींचा शोध घेत आहेत.