Ahmednagar Elections : शरद पवारांनी फक्त ‘तो’ खुलासा करावा ! राधाकृष्ण विखे पाटलांचा घणाघात

Ahmednagar Elections : सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात महायुतीने आणि महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. आपल्या अधिकृत उमेदवारसाठी जोरदार प्रचार सध्या सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर महायुतीने देखील जय्यत तयारी सुरू केली असून महायुतीमध्ये समाविष्ट असलेल्या अजित पवार गटाने या पार्श्वभूमीवर जिल्हा मेळाव्याचे आयोजन केले होते.

या मेळाव्याला महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील आणि त्यांचे वडील, राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी निलेश लंके यांच्यावर कटाक्ष साधला.

सुपा एमआयडीसी मधील गुंडगिरीपासून ते जिल्ह्याच्या विकासापर्यंत अशी चौफेर फटकेबाजी त्यांनी यावेळी केली. तसेच शरद पवार यांच्या गटात केलेल्या पक्षप्रवेशावरूनही त्यांनी निलेश लंके यांना टार्गेट केले. विखे पाटील यांनी ‘ज्यांनी अजित पवार यांची साथ सोडत त्यांना फसवले उद्या ते जनतेची ही साथ सोडणार आहेत.

त्यांनी जिल्ह्यासाठी केलेले एखादे तरी मोठे काम दाखवा. मगच एमआयडीसी आणण्याच्या गप्पा मारा,’ अस म्हणतं निलेश लंके यांच्यावर घणाघात केला आहे. तसेच पुढे बोलताना विखे पाटील यांनी मी एमआयडीसी साठी 1700 एकर जागा विनामूल्य उपलब्ध करून दिलेली आहे.

आता सुपा एमआयडीसीमधील उद्योजकांना तथा कारखानदारांना मोकळा श्वास घेता यावा यासाठी सुपा एमआयडीसीमधील गुंडगिरी संपवायची आहे. यासाठी डॉक्टर सुजय विखे पाटील यांना विक्रमी मताधिक्याने निवडून आणायचे आहे. तसेच या कामी राष्ट्रवादी काँग्रेसचे देखील साथ लागणार असल्याचे त्यांनी नमूद केले असून त्यांच्या सहकार्याची अपेक्षा यावेळी व्यक्त केली आहे.

शरद पवारांनी तो खुलासा करावाच

पालकमंत्री विखे पाटील यांनी डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी पत्रकारांशी संवाद साधताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे सुप्रिमो शरद पवार यांच्यावर देखील टीका केली आहे. विखे पाटील यांनी “ही निवडणूक निलेश लंके यांच्यावर लादली गेली आहे.

अजितदादासोबत गेलेला एक आमदार त्यांना सोडून लगेचच तुमच्याकडे गटात कस काय आला ? याचा खुलासा शरद पवार यांनी केला पाहिजे. त्यांच्या पक्षाने हा आयात केलेला उमेदवार आहे. जिल्ह्यात भांडणे सुरू राहिली पाहिजेत हाच त्यांचा अजेंडा आहे,” अशी टीका शरद पवार यांच्यावर केली आहे.

आम्ही विकासाच राजकारण करतो

यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी आम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोलतो, आम्ही विकासाचा वसा घेऊन आलो आहोत. आमच्यावर विश्वास ठेवून गेल्या निवडणुकीत नागरिकांनी आम्हाला विजयी बनवले आहे. या विश्वासास पात्र राहून आम्ही मतदारसंघात मोठी विकास कामे केलीत अस म्हटले आहे.