Nilesh Lanke News : अहमदनगर जिल्ह्यात सध्या राजकीय वातावरण पूर्णपणे तापलेले पाहायला मिळत आहेत. महायुतीचे आणि महाविकास आघाडीचे नेते पायाला भिंगरी बांधत नगर जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघात जोरदार प्रचार करत असल्याचे चित्र आहे. महाविकास आघाडीचे नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीचे अधिकृत उमेदवार तथा पारनेरचे माजी आमदार निलेश लंके यांनीही लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनसंपर्क वाढवण्यास सुरुवात केली आहे.
यासाठी त्यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात जनसंवाद यात्रेचे आयोजन केलेले आहे. महायुतीचे अधिकृत उमेदवार सुजय विखे पाटील यांनी देखील जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे.
महायुतीमधील सर्व मित्र पक्ष सुजय विखे पाटील यांच्या विजयासाठी जय्यत प्रचार करत असल्याचे पाहायला मिळतं आहे. यामुळे नगर हे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रबिंदू बनले आहे. नगरकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
राजकीय वर्तुळाचे नगरमधील राजकीय घडामोडींकडे विशेष लक्ष आहे. दरम्यान, आज निलेश लंके यांच्या महत्त्वाकांक्षी जनसंवाद यात्रेचे नियोजन विस्कटत असल्याचे पाहायला मिळाल्याने याची सध्या नगरच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरु आहे.
लंके यांच्या जनसंवाद यात्रेच्या सभेचे तिसगाव येथे चक्क नियोजन झाले नसल्याचे वृत्त समोर आले आहे. तिसगाव येथे जनसंवाद यात्रेच्या सभेचे नियोजन झाले नसल्याने निलेश लंके यांनी आपल्या कार्यकर्त्यांवर नाराजी व्यक्त केली आणि पुढे शिरापूरकडे रवाना झाले.
यावरून जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. विशेष म्हणजे याचे व्हिडिओ देखील आता समाज माध्यमांवर वेगाने वायरल होत आहेत. हे व्हिडिओज मोठ्या प्रमाणात समाज माध्यमांवर प्रसारित केले जात आहेत.
दरम्यान, लंके यांच्या या जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने त्यांच्यावर भारतीय जनता पक्षाने जोरदार टीका केली आहे. भारतीय जनता पक्षाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी लंके यांच्यावर टीका केली आहे.
यावेळी त्यांनी, ही जनसंवाद यात्रा नसून ही फसवणूक यात्रा असल्याचा घणाघात केला आहे. तसेच लंके यांनी हा फुगा फुगवलेला आहे, हा फुगा आता लवकरच फुटणार आहे.
मतदारसंघातील नागरिक लंके यांच्या जनसंवाद यात्रेला प्रतिसाद देणार नाहीत, कारण की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून पुन्हा एकदा ते सुजय विखे पाटील यांनाच विक्रमी मताधिक्याने निवडून आणणार आहेत, असं म्हणत सुजय विखे पाटील यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.
यावेळी त्यांनी निलेश लंके हे देखील गेली पाच वर्ष सत्तेत होते, परंतु त्यांनी कुठले विकास काम केले हे त्यांनी दाखवून दिले पाहिजे अस म्हटले आहे. यावेळी त्यांनी लंके यांना पक्ष बदलू, दल बदलू असे म्हणतं जोरदार निशाणा सुद्धा साधला आहे.