सध्या लहान बाळापासून तर वृद्धापर्यंत मोबाईल जीवनाचा भाग बनला आहे. लहान मुलांच्या अभ्यासासह अनेक महत्त्वाच्या कामांसाठी मोबाईल वापरला जातो. मात्र, मोबाईलचा अतिवापर येणाऱ्या काळात डोळ्याचे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो, असे मत नेत्ररोग तज्ज्ञ डॉ.ज्योती मोमले यांनी व्यक्त केले आहे.
विशेष करून लहान मुलांनी मोबाईल जास्त बघितल्याने डोळे खराब होण्याचा धोका असतो. बदलत्या जीवनशैलीत दिवसेंदिवस मोबाईल, टीव्ही, संगणकाचा अतिवापर होत आहे. त्यामुळे आरोग्य धोक्यात येत आहे.
बालकांना मोबाईल वापरण्यास दिल्याने फायद्यापेक्षा तोटे जास्त आहे. परिणामी, लहान मुलांमध्ये डोळ्यांच्या विकारांत वाढ होत असून, अनेक पालक स्वतःची कामे आटोपण्यासाठी मुलांना मोबाईल देतात. परंतु लहान मुलांना मोबाईल देणे टाळले पाहिजे, त्या उलट मैदानी खेळांवर जास्त भर दिला पाहिजे.
दिवसभरात केवळ एक तास टीव्ही पाहणे. टीव्ही दहा ते पंधरा फुटांवरून पाहावा. मुलांना संगणक, मोबाईलपासून दूर ठेवा. आहारात सकस पदार्थांचा समावेश असावा. डोळ्यांच्या तक्रारी जाणवल्यास नेत्र तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधावा. स्क्रीनचा प्रकाश डोळ्यांसाठी घातक असल्याचे नेत्र तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यावर उपाय म्हणजे पालकांनीच मुलांना मोबाईल, संगणक, टीव्हीपासून दूर ठेवणे योग्य ठरेल.
मोबाईलवर तासन्तास गेम खेळणे, इतर गोष्टी पाहण्याचा अतिरेकी वापर चक्क डोळ्यांवर परिणाम करू लागला आहे. रात्री मोबाईलचा उजेड थेट डोळ्यांवर पडतो. आणि डोळ्यांवर ताण वाढतो. मोबाईलचा अतिवापर केल्याने मोठा क्रमांकाचा चष्मा वापरावा लागतो.
पालकच मुलांना टीव्ही, संगणक, मोबाईलवर गेम खेळायला देतात. तासन्तास मोबाईल बघत बसतात. डोळ्यांच्या विविध प्रकारच्या तक्रारी घेऊन मुले येत आहेत. त्यात नऊपैकी एका मुलांमध्ये दृष्टिदोष आढळून येत आहे. त्यांना चष्म्याशिवाय पर्याय नसतो- डॉ. ज्योती मोमले, नेत्ररोग तज्ज्ञ, श्रीरामपूर
चौफेर आहार घेणे गरजेचे
आपले आजी आजोबा ज्याप्रमाणे चौफेर आहार घेत होते. तसा सकस, सात्विक आहार घेणे आवश्यक आहे. अलीकडे लहान मुलांचा चटपटीत खाण्याकडे (जंगफूड) कल वाढत आहे.
मोबाईल, संगणक, टीव्हीप्रमाणे प्रोटिनयुक्त आहाराचा अभावही कारणीभूत आहे. मुलांना कडधान्ये पालेभाज्यांचा समावेश असलेला जीवनसत्त्वयुक्त आहार देणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे नेत्र तज्ज्ञांचे म्हणणे आहे.