Narendra Modi Gujrat News : 2014 मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारने भारतातून भ्रष्टाचार गायब केला असल्याचा दावा केला आहे. ज्या ठिकाणी भाजप सरकार आहे तिथे भ्रष्टाचार नाही असे मत भाजपचे आहे.
मात्र बीजेपी सत्तेत असलेल्या गुजरात राज्यात भ्रष्टाचाराचे एक अनोखे प्रकरण समोर आले आहे. पीएम मोदींचे गुजरातमधील विकासाचे मॉडेल संपूर्ण देशातील निवडणूक प्रचारांमध्ये एका हत्याराप्रमाणे वापरले जाते.

गुजरात मॉडेल हे भाजपासाठी एक निवडणूक प्रचाराचे यशस्वी अस्त्र आहे. या गुजरात मॉडेलमुळे 2014 मध्ये भारतीय जनता पार्टीला नागरिकांनी प्रचंड बहुमत देऊन नरेंद्र मोदी यांना देशाच्या गादीवर बसवले आहे. मात्र गुजरातमध्ये आता ‘भ्रष्टाचाराचे विकास मॉडेल’ उघड झाले आहे.
गुजरात मधील एका राष्ट्रीय महामार्गावर काही धनदांडग्या लोकांनी खाजगी जमिनीवर राष्ट्रीय महामार्ग बायपास करून त्यावर बोगस टोलनाका उभारण्याचा भीमपराक्रम केला आहे. विशेष बाब म्हणजे या बोगस टोल नाक्यावरून तब्बल दीड वर्षांपर्यंत अवैध वसुली देखील झाली आहे.
बामनबोर-कच्छ राष्ट्रीय महामार्ग खाजगी जमिनीवरून डायवर्ट करून त्यावर टोल नाका उभारून तब्बल दीड वर्ष करोडो रुपयांची अवैध वसुली करण्यात आली आहे. यामुळे तब्बल दीड वर्ष प्रशासनाच्या डोळ्यात धुळपेक करून कोट्यावधी रुपयांचा घोटाळा नेमका झाला कसा ? तसेच राजकीय लोकांच्या छत्रछायेत तर हा भीम पराक्रम झाला नाही ना? हा सवाल उपस्थित केला जात आहे.
कुठं घडला हा प्रकार
हा प्रकार गुजरातच्या मोरबी मध्ये घडला आहे. मोरबी येथील बामनबोर-कच्छ राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या जमिनीच्या मालकानं गेल्या दीड वर्षांत बोगस टोल नाक्यातून कोट्यवधी रुपये छापले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक व्हाईट हाऊस सिरॅमिक कंपनी आणि वर्गसिया गावातून वळवली होती. येथे बोगस टोल नाका उभारून टोल वसूल केला जात होता.
आरोपी ट्रक चालकांकडून फक्त निम्मा टोल घेत होते. या राष्ट्रीय महामार्गावर जो सरकारी कंपनीचा टोलनाका आहे तिथे 110 ते 595 रुपये एवढा टोल आकारला जात आहे. मात्र या धनदांडग्या लोकांनी उभारलेल्या या बोगस टोलनाक्यावर फक्त 20 रुपयांपासून ते दोनशे रुपयांपर्यंतचा टोल घेतला जात होता. परिणामी वाहन चालक याच मार्गाने जाणे पसंत करू लागले. या मार्गावरील वाहतूक दिवसेंदिवस वाढत गेली.
जवळपास दीड वर्ष हा खेळ असाच सुरू राहिला. सरकारला या बोगस टोलनाक्याची खबर देखील नव्हती. पण अखेरकार पोलिसांच्या विश्वसनीय सूत्रांनी याबाबत इनपुट दिले. यानंतर पोलिसांनी ताबडतोब या संबंधित बोगस टोल नाका उभारणाऱ्या लोकांवर कारवाई केली आहे.
त्यांच्या विरोधात सविस्तर तक्रार दाखल करण्यात आली आहे. व्हाईट हाऊस सिरॅमिक कंपनीचे मालक अमरशी पटेल, रविराज सिंह झाला, हरविजय सिंह झाला, धर्मेंद्र सिंह झाला, युवराज सिंह झाला आणि अज्ञातांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.