Chandrayaan 3 : चंद्राभोवती किमान २५ किमी तर कमाल १३४ किमी अंतरावरून प्रदक्षिणा घालणारे चांद्रयान पृष्ठभागापासून ३० किमी उंचीवर असताना लॅण्डिंगची प्रक्रिया सुरू झाली. भारतीय प्रमाणवेळेनुसार बुधवारी संध्याकाळी ५ वाजून ४४ मिनिटांनी लँडरने पॉवर ब्रेकिंग फेजमध्ये पाऊल ठेवले.
चंद्राच्या पृष्ठभागाच्या दिशेने वेगाने जाणाऱ्या यानाचा वेग कमी करण्यासाठी चार थ्रस्टर इंजिनांमधून रेट्रो फायरिंग करण्यात आली. तिरप्या रेषेत खाली येत यानाने सुमारे ७१३ किमी अंतर कापले. पृष्ठभागापासून यान सुमारे ६.८ किमी उंचीवर असताना दोन इंजिन बंद करण्यात आली आणि केवळ दोनच इंजिनांचा वापर करण्यात आला.
यानंतर आडवे चांद्रयान सरळ झाले. इंजिनांचा रिव्हर्स थ्रस्ट म्हणजे उलट दिशेने वापर करून यानाचा वेग कमी करण्यात आला. हे करत असताना काही अंतर पार करत यान आपले कॅमेरा, सेन्सर्सचा वापर करत लॅण्डिंगच्या ठिकाणाची पडताळणी करत होते.
पृष्ठभागापासून १५० मीटर उंचीवर असताना काही सेंकद हवेत राहून यानाने आपल्या लॅण्डिंगच्या ठिकाणाचा आढावा घेतला आणि संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांच्या सुमारास ते चंद्रावर उतरले.
सुमारे २० मिनिटांचा हा थरार काळजाचा ठोका चुकवणारा होता. चांद्रयान- २ याच टण्यात अपयशी ठरले होते. त्यावेळी झालेल्या चुकांमधून धडा घेत इस्रोने चांद्रयान- ३ मोहीम यशस्वीरीत्या पार पाडत इतिहास रचला.
असा झाला चांद्रयान- ३ चा प्रवास
१४ जुलै : आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून एलव्हीएम३- एम४ अग्निबाणाच्या मदतीने ‘चांद्रयान- ३’ अवकाशात झेपावले आणि पृथ्वीच्या कक्षेत यशस्वी स्थिरावले
१५ जुलै: परिभ्रमण कक्षा रुंदावण्याची पहिली प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाली
१७ जुलै : कक्षा रुंदावण्याची दुसरी प्रक्रिया पूर्ण
२२ जुलै : इस्रोने चांद्रयानाची कक्षा अजून एकदा वाढवली
२५ जुलै : चांद्रयान पृथ्वीभोवतीच्या अखेरच्या परिभ्रमण कक्षेत
१ ऑगस्ट : ट्रान्सलूनर इंजेक्शन अर्थात अखेर धक्का देऊन चांद्रयान पृथ्वीच्या कक्षेतून चंद्राच्या दिशेने रवाना
५ ऑगस्ट चांद्रयान- ३चा चंद्राच्या कक्षेत यशस्वीरीत्या प्रवेश
६ ऑगस्ट चांद्रयानाची परिभ्रमण कक्षा कमी करण्याची पहिली प्रक्रिया पूर्ण
९ ऑगस्ट: परिभ्रमण कक्षा घटवून चांद्रयान चंद्राच्या अजून जवळ आणण्यात आले
१४ ऑगस्ट : चांद्रयानाची अजून एकदा कक्षा घटवण्यात आली
१६ ऑगस्ट: परिभ्रमण कक्षा घटवण्याची अजून एक प्रक्रिया पूर्ण
१७ ऑगस्ट: प्रणोदन मॉड्यूलपासून लॅण्डिंग मॉड्युल यशस्वीपणे विभक्त झाले
१९ ऑगस्ट : लॅण्डिंग मॉड्युल चंद्राच्या अजून जवळ नेण्यासाठी डिबुस्टिंग करण्यात आले
२० ऑगस्ट : लॅण्डिंग मॉड्यूल कक्षा कमी करून चंद्राच्या किमान २५ किमी तर कमाल १३४ किमी कक्षेत
२१ ऑगस्ट : चांद्रयान- २चे ऑर्बिटर आणि चांद्रयान- ३चे लॅण्डिंग मॉड्युल यांच्यात संपर्क प्रस्थापित
२२ ऑगस्ट : चंद्राच्या पृष्ठभागाची सुमारे ७० किमी उंचीवरून घेतलेली छायाचित्रे इस्रोने जारी केली
२३ ऑगस्ट : चांद्रयान-३ चे चंद्रावर यशस्वीरीत्या सॉफ्ट लॅण्डिंग करत भारताने इतिहास रचला