Petrol Diesel Execise Duty : देशभरातील नागरिकांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे ८ एप्रिलपासून केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. उत्पादन शुल्कात प्रति लिटर २ रुपयांनी वाढ करण्यात आली असून, अर्थ मंत्रालयाने ७ एप्रिल रोजी या निर्णयाची अधिकृत घोषणा केली. सरकारच्या महसूलात वाढ व्हावी, हा या निर्णयामागचा मुख्य हेतू आहे. मात्र, यामुळे इंधनाच्या किमती वाढतील का, याबाबत सामान्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
ग्राहकांवर तात्काळ भार येणार नाही
शुल्कवाढ झाली असली तरी सामान्य नागरिकांवर त्याचा तात्काळ परिणाम होणार नाही, असं पेट्रोलियम मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. तेल कंपन्यांनी ही वाढ स्वतः झेलण्याचा निर्णय घेतला असून, किरकोळ दरात कोणताही बदल सध्या होणार नाही. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होणार असल्याची भीती काही काळ तरी टळली आहे.

तेल कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम
उत्पादन शुल्कात वाढ केल्यामुळे तेल कंपन्यांच्या नफ्यावर निश्चितच परिणाम होण्याची शक्यता आहे. मागील काही महिन्यांमध्ये उत्पादन शुल्कात कपात करण्यात आली होती, परंतु आता पुन्हा त्यात वाढ झाल्याने कंपन्यांवरील आर्थिक दडपण वाढेल. ही वाढ जर दीर्घकाळ चालू राहिली, तर भविष्यात त्याचा परिणाम ग्राहकांवरही जाणवू शकतो.
आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थितीचा परिणाम
सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घट झाली आहे. WTI क्रूड सध्या प्रति बॅरल $60.16 आणि ब्रेंट क्रूड $63.75 या दराने व्यवहार करत आहे. डॉलर-रुपया विनिमय दर आणि मागणी-पुरवठ्याच्या गणितावर आधारित असलेले देशातील इंधन दर दररोज सकाळी ६ वाजता अपडेट होतात. या घसरत्या दरांचा विचार करून सरकारने किरकोळ दर न वाढवण्याचा निर्णय घेतला असावा.
प्रमुख शहरांतील सध्याचे इंधन दर
दिल्ली – पेट्रोल ₹94.77, डिझेल ₹87.67
मुंबई – पेट्रोल ₹103.50, डिझेल ₹90.03
कोलकाता – पेट्रोल ₹105.01, डिझेल ₹91.82
चेन्नई – पेट्रोल ₹100.80, डिझेल ₹92.39
भोपाळ – पेट्रोल ₹106.52, डिझेल ₹91.89
देशातील मोठ्या शहरांमध्ये सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. ग्राहकांसाठी ही एक मोठी दिलासादायक बाब आहे