Sericulture Farming:- शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर आधुनिक तंत्रज्ञान आले आहे.या तंत्रज्ञानाच्या वापराने आता कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेता येणे शक्य झाले आहे. तसेच शेतीमध्ये आता परंपरागत पिकांची जागा फुलपिके तसेच भाजीपाला व फळ पिकांनी घेतल्याने शेतीचा पार चेहरामोहरा बदलून गेला आहे.
यामध्ये गेल्या काही वर्षापासून तर बघितले तर तरुणांचा शेतीकडील ओढा वाढल्यामुळे उच्चशिक्षित तरुण आता शेती व्यवसायात उतरले आहेत व मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर करत असून यामुळे शेती व्यवसाय व्यावसायिक दृष्टिकोनातून एक फायदेशीर व्यवसाय ठरत आहे.
अगदी याच मुद्द्याला धरून नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेल्या जामदरी येथील महेश शेवाळे या उच्चशिक्षित तरुणाची यशोगाथा बघितली तर ती नक्कीच इतर तरुण शेतकऱ्यांना प्रेरणादायी अशी आहे.
भाडेतत्वावर शेती घेऊन यशस्वी केली रेशीम शेती
नाशिक जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितले तर नांदगाव तालुका हा तसा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी प्रामुख्याने कांदा किंवा मक्यासारखे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. परंतु याच तालुक्यातील जामदरी या छोट्याशा गावातील महेश शेवाळे या 28 वर्षीय तरुण शेतकऱ्याने रेशीम शेतीतून अनोखी प्रगती साधली आहे.
विशेष म्हणजे या तरुणाने दोन एकर शेत जमीन भाडेतत्त्वावर घेतली व रेशीम शेती फुलवली. कांदा तसेच मका व कापूस फुलणाऱ्या शेतामध्ये त्यांनी रेशीम शेतीच्या माध्यमातून महिन्याला एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळवत चांगले आर्थिक उत्पन्न मिळवले आहे. विशेष म्हणजे नांदगाव सारख्या तालुक्यामध्ये रेशीम शेती करणारा हा पहिलाच शेतकरी आहे असे म्हटले तरी वावगे ठरू नये.
बीकॉम पूर्ण केल्यानंतर वळले शेतीकडे
महेश शेवाळे यांची शैक्षणिक पार्श्वभूमी बघितली तर त्यांनी बीकॉम पूर्ण केले असून नोकरी न शोधता शेतीकडे लक्ष द्यायचे ठरवले. तसे व्हायला गेले तर त्यांची घरचीच पंधरा एकर बागायती शेती आहे.
परंतु तीच परंपरागत पिके त्यांच्या शेतामध्ये घेतली जात होते व त्याकरिता त्यांनी घरच्या शेतीमध्ये रेशीम शेती करावी असे कुटुंबाला सुचवले. परंतु कुटुंबीयांनी म्हटले की या शेतीमध्ये रेशीम उत्पादन किंवा रेशीम शेती करता येणार नाही व त्यामध्ये हे शक्य होणार नाही अशा पद्धतीने सांगितल्यानंतर त्याने हार न मानता दोन एकर शेती भाड्याने दया असे त्यांना सांगून त्या शेतीमध्ये एक महिन्याचे पीक असलेली रेशीम शेती फुलवली.
जून महिन्यामध्ये त्यांना पहिले उत्पादन मिळाले व दोन एकरातून एक लाखाचे उत्पन्न त्यांनी घेतले व जून ते मार्चमध्ये प्रत्येक महिन्यात प्रत्येकी एक लाखाचे उत्पन्न या शेतीतून महेश यांना मिळाले. रेशीम शेतीच्या दृष्टिकोनातून बघितले तर याविषयीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यावर रेशीम कोष तयार होतो व त्यानंतर त्याचा धागा तयार होतो.
नाशिक जिल्हा म्हटलं म्हणजे द्राक्ष आणि कांदाचा पट्टा म्हणून ओळखला जातो व या ठिकाणी रेशीम शेती खूपच कमी प्रमाणात केली जाते. परंतु महेश यांना कृषी विभागाच्या माध्यमातून पाठबळ व प्रोत्साहन मिळाले व त्या बळावर त्यांनी किमया साध्य करून दाखवली.
विशेष म्हणजे रेशीम शेती वाढण्यासाठी सरकार अनुदान देखील देते व कमी खर्चातून जास्त उत्पन्न देणारी शेती असल्यामुळे इतर शेतकऱ्यांनी देखील रेशीम शेतीकडे वळावे ही आता गरज आहे.