Agricultural News : देशाच्या अनेक भागांत यंदा पावसाने दडी मारल्याने चालू हंगामात तुरीच्या उत्पादनात तब्बल १८ टक्क्यांनी घट होण्याची शक्यता कृषी विभागाच्या साप्ताहिक अहवालातून व्यक्त करण्यात आली आहे. उत्पादनात होणारी ही घट सध्या वाढत्या डाळींच्या दराला आणखी फोडणी देणारी ठरणार आहे.
दरवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाने अद्याप महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये सरासरीदेखील ओलांडलेली नाही. बहुतांश भागात दुष्काळसदृश परिस्थिती असून खरीप पिके संकटात आहेत. या खरीप पिकांमध्ये तूर हे अतिशय महत्त्वाचे पीक आहे. त्याला मोठा फटका बसणार आहे.

देशात गतवर्षी तुरीचे उत्पादन ४२.२० लाख मेट्रिक झाले होते, तर यंदा हेच उत्पादन ३४.३० लाख मेट्रिक टनापर्यंत खाली येण्याचा अंदाज अहवालातून वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रतील उत्पादनातही मोठी घट होणार आहे. लातूर अमरावती, अहमदनगर, औरंगाबाद बीड, जालना, हिंगोली, सांगली सोलापूर, अकोला येथील तुरीची पिके पावसाअभावी करपत आहेत सध्या तुरीची आधारभूत किंमत प्रतिक्विंटल ६,६०० रुपये आहे,
तर खुल्या बाजारात मिळणारा दर मात्र तब्बल ११,१०० रुपयांपर्यंत आहे. शासकीय हमीभावापेक्षाही खुल्या बाजारात चांगला दर मिळत आहे. उत्पादनात होणारी घट तुरीचे हे दर आणखी वाढण्यास कारणीभूत ठरणार आहे. भात, उडीद, तेलबियांच्या उत्पादनातही यंदा घट होण्याची शक्यता आहे.
सन २०२१-२२ पासून सरकारने मुक्त तूर आयातीचे धोरण राबवले आहे. त्यामुळे देशात तुरीची विक्रमी आयात झाली होती. त्यामुळे बाजारात तुरीचे दर दबावात येऊन शेतकरी अडचणीत आले होते. त्यानंतरही सरकारने मुक्त आयातीला ३१ मार्च २०२३ पर्यंत मुदत दिली होती. आता पुन्हा तूर आयात धोरणाला मार्च २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून तुरीच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी अधिकाधिक तूर आयात करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.













