Agricultural News : पुणे हवामान विभागाने आगामी दहा दिवस पावसाची शक्यता नसल्याचा अंदाज वर्तविल्याने नाशिक जिल्ह्यावर दुष्काळाचे ढग दाटले आहे. पावसाच्या भरवशावर आतापर्यंत ९२ टक्के पेरणी झाली असली, तरी पावसाअभावी पिके करपू लागली आहेत.
नाशिककरांना पिण्याच्या पाण्याची फारशी टंचाई जाणवणार नसली तरी ग्रामीण भागात मात्र जनावरांच्या चारापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्ह्याच्या पूर्व भागात अजूनही दमदार पाऊस झालेला नाही. दिंडोरीवगळता एकाही तालुक्यात पावसाने सरासरी पूर्ण केलेली नाही. जिल्ह्यात आतापर्यंत हंगामातील फक्त ४० टक्के, तर ऑगस्टपर्यंत ७०.१ टक्के पाऊस पडला आहे. दरम्यान, प्रशासनाने जिल्ह्यात अवर्षणासंदर्भात सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे
पावसाची तूट शेतकऱ्यांच्या मुळावर आली असून, अजूनही आठवडाभर पाऊस आला नाही, तर दुष्काळ जाहीर करण्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही. पुणे हवामान विभागाने सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यानंतर चांगला पाऊस पडेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. मात्र, त्यासाठी अजूनही दहा दिवसांचा अवधी शिल्लक असल्याने तोपर्यंत पाऊस आला नाही, तर पिके करपण्याची भीती व्यक्त होत आहे.
दिंडोरी, पेठ व सुरगाणा या तालुक्यातच फक्त पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावली आहे. पावसाचे माहेरघर असलेल्या इगतपुरीतही ऑगस्टपर्यंतच्या सरासरीच्या केवळ ६३ टक्के पाऊस पडला आहे, तर त्र्यंबकेश्वरमध्येही आतापर्यंत केवळ ७४ टक्के पाऊस पडला आहे. पूर्वेकडील तालुक्यांमध्ये तर पन्नास ५० टक्केदेखील पाऊस झालेला नाही. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत मान्सूनचा पाऊस पडतो. या चार महिन्यांच्या एकूण सरासरीच्या ४० टक्के पाऊस नाशिक जिल्ह्यात पडला आहे, तर ऑगस्टपर्यंत ७० टक्के पाऊस पडला आहे. याचाच अर्थ जिल्ह्यात अजूनही ३० टक्के पर्जन्याची तूट झाली आहे
पाणीसाठ्यातही तूट
पावसाअभावी जिल्ह्यातील पाणीसाठ्यात ३४ टक्के तूट निर्माण झाली आहे. गतवर्षी ऑगस्टअखेर जिल्ह्यातील धरणांमध्ये ९४ टक्के पाणीसाठा होता. यंदा केवळ ६६ टक्के पाणीसाठा आहे. गिरणा धरण केवळ ३७ टक्के भरले असून, गेल्या वर्षी याचवेळी धरण ९२ टक्के भरले होते. सद्यस्थितीत गंगापूर ९१ टक्के, काश्यपी ६०, आळंदी ८२, पालखेड ५१, करंजवण ६२, ओझरखेड ४२, पुणेगाव ८८, दारणा ९६, भावली १००, मुकणे ७७, वालदेवी १००, कडवा ८२, भोजापूर ६५, चणकापूर ८८, हरणबारी १००, केळझर १००, गिरणा ३७, पुनद ७०, एकूण ६६ टक्के.
दुष्काळी सर्वेक्षण अहवाल सादर करण्याचे आदेश
दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने नुकसान भरपाईसाठी तत्काळ सर्वेक्षण करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. जिल्ह्यात ५० टक्के सर्वेक्षण पूर्ण झाले असून, कृषी विभागामार्फत सोमवारी अंतिम अहवाल सादर करण्यात येईल. जिल्ह्यात खरिपाची ९२ टक्के पेरणी झाली. अशा परिस्थितीत सलग २१ दिवस झाले, तरी पाऊस न झालेल्या भागाचे तत्काळ सर्वेक्षण करण्यात येत आहे.
कृषी विभागाचे अधिकारी व इन्शुरन्स कंपनीचे कर्मचारी थेट बांधावर जाऊन सर्वेक्षण करीत आहेत. जिल्ह्यातील पाच लाख ८६ हजार शेतकऱ्यांनी यंदा पीकविमा उतरवला आहे. त्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात येत आहेत. प्रत्येक मंडलातील निवडक गावांमध्ये जाऊन तेथील पिकांची पाहणी करून ऑनलाइन स्वरूपात त्याची नोंद केली जाते.
तालुकानिहाय पाऊस (टक्के) मालेगाव ७४.५, बागलाण ७९.०, कळवण ८५.९. नांदगाव ५५.१. सुरगाणा ८९.२, नाशिक ५७.४, दिडोरी ११९.८, इगतपुरी ६२. ९, पेठ ८७.०, सिन्नर ५३.०, येवला ६९.४, चांदवड ५२.१, त्र्यंबकेश्वर ७१.८, देवळा ६९.४. एकूण ७०.३.