Soybean Market Price: दिवाळीत देखील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची निराशाच! वाचा सोयाबीन बाजारभावाची स्थिती

Ajay Patil
Published:

Soybean Market Price :-यावर्षी संपूर्ण राज्यामध्ये पावसाने दडी मारल्यामुळे कापूस आणि सोयाबीन सारख्या महत्त्वाच्या पिकांच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे.

पावसासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान तर झालेच परंतु आता जे उत्पादन हातात आलेले आहे त्याला देखील कवडी मोलाचा दर मिळत असल्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडलेले आहेत.

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था तर खूपच दयनीय होताना दिसून येत आहे. दिवाळी सारखा महत्त्वाचा सण अगदी काही दिवसांवर आला आहे.परंतु तरीदेखील दिवाळी सारख्या सणाची तयारी करता येईल इतका पैसा देखील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या हातात येण्याची परिस्थिती नाही.

या दिवाळी सारखा सणाच्या कालावधीमध्ये बऱ्याच ठिकाणी व्यापारी वर्गाकडून शेतकऱ्यांनी जो काही पैसा उधार घेतलेला असतो तो वसूल करण्यावर व्यापारी वर्ग भर देत असतो. त्यामुळे या कालावधीत आर्थिक अडचणीतून मुक्त होण्यासाठी शेतकरी सोयाबीन विक्री मोठ्या प्रमाणावर करत आहेत.

त्यामुळे राज्यातील बराच बाजारपेठेमध्ये आवक दुपटीने वाढताना दिसून येत आहे. आवक वाढल्याने भाव मात्र समाधानकारक मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांची घोर निराशा होत आहे.

हिंगोली जिल्ह्यातील मोंढा बाजार समितीत सोयाबीनच्या आवकेत वाढ

हिंगोली जिल्ह्यातील मोंढ्यात सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली असून भाव मात्र 4700 रुपयांच्या वर जात नसल्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळीच्या तोंडावर मोठे निराशा होत आहे.

चार नोव्हेंबरचा विचार केला तर या ठिकाणी 1880 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. परंतु बाजारभाव मात्र किमान 4505 तर जास्तीत जास्त 4930 रुपयांपर्यंत मिळाला.

सोयाबीन पाच हजार रुपये प्रति क्विंटलचा टप्पा ओलांडत असल्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

आवक वाढल्याने सोयाबीन टाकण्यासाठी शेड पडत आहेत अपूर्ण

मोंढा बाजार समितीमध्ये सोयाबीनचे आवक वाढल्यामुळे सोयाबीन टाकण्याकरिता टीनशेड अपूर्ण पडत आहेत. त्यामुळे शनिवारी काही शेतकऱ्यांना सोयाबीन रस्त्यावर टाकावे लागले.

सकाळी अकरा वाजेपर्यंत जे सोयाबीन मार्केटमध्ये आले त्यांनाच शेडमध्ये जागा मिळाली. त्यानंतर मात्र आलेल्या सोयाबीनला जागा न मिळाल्याने सोयाबीन रस्त्यावर टाकून बीट पुकारावी लागली.

शेतकरी दुहेरी संकटात

या हंगामात कमी पडलेला पाऊस तसेच जेव्हा सोयाबीन परिपक्व होण्याच्या कालावधीत होते तेव्हा येल्लो मोजेक सारख्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे सोयाबीन पिकावर विपरीत परिणाम झाला.

बऱ्याच ठिकाणी शेंगा परिपक्व होण्याआधीच वाळून गेल्या व त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट झाली. आधीच हातात उत्पादन कमी व भाव देखील कवडीमोल मिळत असल्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी मात्र दुहेरी संकटात सापडलेले आहेत. उत्पादन तर कमी आहेच परंतु आता बाजारभाव तरी चांगला मिळावा अशी रास्त अपेक्षा शेतकऱ्यांची आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe