Farmer Success Story:- सध्याची तरुणाई गेल्या काही वर्षापासून मोठ्या प्रमाणावर शेतीकडे वळू लागले असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वेगवेगळी भाजीपाला पिके तसेच फळबागांच्या लागवडीच्या माध्यमातून खूप चांगला नफा मिळवताना दिसून येत आहेत.
यामध्ये जर आपण पाहिले तर बहुतेक तरुण हे उच्चशिक्षित असून नोकऱ्यांची उपलब्धता कमी असल्यामुळे नोकऱ्यांच्या मागे न लागता घरच्या शेतीचा व्यावसायिक दृष्टिकोनातून वापर करून जास्तीत जास्त नफा कसा मिळवता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करत आहेत व यशस्वी देखील होत आहेत.

यामध्ये वेगवेगळ्या फळबागांच्या लागवडीचा विचार केला तर काही तरुण शेतकरी ड्रॅगन फ्रुट पासून तर स्ट्रॉबेरी आणि डाळिंब तसेच द्राक्ष, पेरू सारख्या फळबागांकडे मोठ्या प्रमाणावर वळले असून काही तरुणांनी तर सफरचंदाची लागवड देखील यशस्वी केलेली आहे.
अगदी याच पद्धतीने जर आपण महाबळेश्वर तालुक्यातील खिंगर या गावचे अनिल दुधाने या उच्चशिक्षित असलेल्या तरुण शेतकऱ्याची यशोगाथा पाहिली तर या शेतकऱ्याने चक्क सफरचंदाची लागवड यशस्वी केली आहे.
अनिल दुधाने यांनी सफरचंदाची लागवड केली यशस्वी
याबाबत सविस्तर वृत्त असे की, महाबळेश्वर तालुक्यात असलेल्या खिंगर या गावचे अनिल दुधाने हे उच्चशिक्षित तरुण आहेत व त्यांनी इंजिनिअरिंग पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. परंतु इंजिनिअरिंग करून नोकरी शोधण्यापेक्षा त्यांनी शेतीमध्ये काहीतरी करावे अशी मनामध्ये इच्छा बाळगली व त्यातूनच त्यांना सफरचंद लागवडीची कल्पना सुचली. लागलीच यासाठी कामाला ते लागले व याबद्दल माहिती मिळवायला सुरुवात केली
व सर्व माहिती मिळवून सफरचंद लागवड करण्याचा निर्णय अखेरीस त्यांनी घेतला. याकरिता त्यांनी हिमाचल प्रदेश या राज्यातून दर्जेदार सफरचंदाचे रोपे उपलब्ध केली. त्यांनी सफरचंदाची लागवड प्रयोग म्हणून राबवण्यासाठी हिमाचल येथून रेड डिलिशियस, मॉकीटोश, रेड अंबरी आणि हार्मोन 99 या जातींची 20 रोपे आणली
व साधारणपणे दोन वर्ष अगोदर त्यांनी त्यांच्या शेतामध्ये लागवड केली. विशेष म्हणजे कुठल्याही प्रकारचे रासायनिक कीटकनाशक व खतांचा वापर न करता त्यांनी फक्त वापर करून आवश्यक ते सूक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापन ठिबकच्या माध्यमातून केले व सफरचंदाचे प्रभावीपणे उत्पादन घेतले.
आज झाडांना लगडली आहेत मोठ्या प्रमाणावर सफरचंद
त्यांनी वेगवेगळ्या जातीची सफरचंदाची लागवड त्यांच्या शेतात केली असून त्यातील हार्मोन 99 या सफरचंदाच्या प्रजातीचे झाडे सफरचंदांनी लगडली असून ते आता काढणीला आले असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
या वीस झाडांना चांगल्या पद्धतीने फळधारणा झाल्यामुळे येणाऱ्या भविष्यकाळात सफरचंदाच्या लागवड क्षेत्रात वाढ करण्याचा त्यांचा विचार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. तसेच या सर्व जातींपैकी हार्मोन 99 ही सफरचंदाची प्रजात उत्तम असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.
अशा पद्धतीने मनामध्ये वेगळे करण्याची इच्छा असली व ती पूर्ण करण्यासाठी आवश्यक माहिती मिळवून जर सुरुवात केली तर यश मिळते हे अनिल दुधाने यांच्या उदाहरणावरून आपल्याला दिसून येते.