Agriculture News : जेमतेम झालेल्या पावसावर खरीप हंगामातील पेरणी झाली असली तरी ग्रामीण भागात अजून मोठा पाऊस झाला नसल्याने शेतकरी वर्गावर चिंतेचे ढग दाटून आले आहेत.
बहुतेक ठिकाणी केलेली पेरणी वाया जावून दुबार पेरणीच्या संकटाच्या चिंतेचे मळभ शेतकरी वर्गात दिसून येत आहे. तब्बल महिन्याभरच्या अंतराने उशीरा , आलेला मान्सूनच्या आगमनाने शेतकरी वर्ग काहीसा सुखावला गेला.
साधारण १५ जून ते १५ जुलैपर्यंत खरीप हंगामातील पेरा झाल्यास उत्पादन व्यवस्थित होऊन, पुढील रब्बी हंगामातील पीक लागवड चागली करता येत असल्याचे जाणकार शेतकऱ्यांचे मत आहे; परंतु मुळातच उशीरा पडलेल्या पावसामुळे शेतीचे अर्थकारण सध्या बिघडले आहे.
तुरळक ठिकाणी झालेल्या जेमतेम पावसावर अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. बी अंकुरून बाहेर आले आहे. अधून मधून पडणाऱ्या उन्हामुळे पिके माना टाकण्यास सुरवात झाली असून रोजचा दिवस उगवतो तसा मावळत असल्याने शेतकरी वर्गाच्या छातीतील धडधड वाढत आहे.
मुळातच अनेक ठिकाणी अजून पेरणीलायक पण पावसाने हजेरी लावली नसल्याने, वर्षभराचे आर्थिक नियोजन अवलंबून असलेला खरीप हंगाम सध्या पावसाअभावी रखडून पडला असून, ज्या शेतकरी वर्गानी पेरणी केली आहे,
त्यांना मात्र पिके वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पावसाची गरज असल्याचे चित्र आहे. शेतमालाचे पडलेले बाजारभाव, वाढती महागाई, वधारलेले शेती उपयुक्त औषधे, बी-बियाणे, खते, मजुरी व त्याची कमतरता आदी बाबींनी शेतकरी वर्गाचे केव्हाच कंबरडे मोडले आहे.
हे सर्व करून ही वरून राजाची अवकृपा त्यामुळे आता पावसाअभावी दुबार पेरणीचे संकट आता नको, अशी मनोमन प्रार्थना बळीराजा ईश्वराजवळ करत आहे. पूर्ण वर्षभराचे शेतीचे आर्थिक नियोजन हे खरिपातील पीक व त्याच्या उत्पादन क्षमतेवर अवलंबून असते. जर खरीपच वाया गेला तर शेतकरी वर्ग मोठ्या आर्थिक संकटात सापडणार असल्याने, त्यामुळे रोज चातकाप्रमाणे बळीराजा पावसाची वाट पहात आहे.