Line-883 Onion Variety:-महाराष्ट्र मध्ये कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते व खासकरून नाशिक जिल्ह्यामध्ये कांदा लागवड मोठ्या प्रमाणावर होते. तसे पाहायला गेले तर आता महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये कमी अधिक प्रमाणात कांद्याची लागवड केली जाते. कांदा पीक खरीप आणि रब्बी हंगामामध्ये मोठ्या प्रमाणावर लागवड होते.
त्यामध्ये आतापर्यंत अनेक महत्त्वाचे असे कांद्याचे बियाणे विविध कृषी संस्थांकडून विकसित करण्यात आलेले आहेत. परंतु आता नाशिक येथील राष्ट्रीय बागवानी अनुसंधान आणि विकास संस्थेतील शास्त्रज्ञांनी कांद्याचे एक नवीन वाण विकसित केले असून त्याला शास्त्रज्ञांनी लाईन 883 असे नाव दिले आहे.
खरीप हंगामात येणारे हे कांद्याचे वाण असून लागवडीनंतर लवकरात लवकर उत्पादन मिळण्यासाठी सक्षम असल्याचा दावा शास्त्रज्ञांच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
राष्ट्रीय बागवानी अनुसंधान आणि विकास संस्थेने विकसित केले लवकर उत्पादन देणारे कांद्याचे नवीन वाण
कांद्यावर संशोधन करणाऱ्या निफाड तालुक्यातील चितेगाव येथील राष्ट्रीय बागवानी अनुसंशोधन केंद्रातर्फे खरिपातील लाल कांद्यावर संशोधन करून नवीन वाण विकसित करण्यात आला असून 80 ते 85 दिवसात या कांद्याचे उत्पादन निघणार आहे. इतकेच नाही तर हा कांदा वजनाने देखील चांगला असल्याने हेक्टरी 300 ते 325 क्विंटल पर्यंत उत्पादन होणार आहे.
इतकेच नाहीतर कांद्याची लागवड ते काढणीपर्यंत या खरीप कांद्यावर करपा आणि मावा रोगाचा प्रादुर्भाव खूप कमीत कमी राहणार असल्याचे देखील सांगण्यात आले आहे. शेतकऱ्यांना हे बियाणे जूनपासून उपलब्ध होणार असून ऑगस्ट महिन्यात त्याची लागवड करता येणार आहे. लाईन ८८३ वाणाचे कांदे बियाणे नाशिक जिल्ह्यातील चितेगाव,
लासलगाव आणि सिन्नर येथील केंद्रांवर उपलब्ध करण्यात येणार आहे.याबाबत माहिती देताना या केंद्राच्या शास्त्रज्ञांनी म्हटले आहे की, खरीप लाल कांदा शेतकऱ्यांना जास्त फायद्याचा होणार असून हा कांदा महाराष्ट्र, मध्यप्रदेश व सर्व राज्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे.
लाल कांद्याला बाजारात चांगली मागणी असल्याने त्यानुसार राष्ट्रीय बागवानी अनुसंधान आणि संशोधन व विकास संस्था अर्थात एनएचआरडीएफच्या शास्त्रज्ञांनी कांद्याचे नवीन वाण विकसित केले असून हेक्टरी 300 ते 325 क्विंटल पर्यंत उत्पादन देणारे हे वाण नक्कीच शेतकऱ्यांसाठी फायद्याचे ठरेल.